मुंबई :
कोकणात सातत्याने येणार्या आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला असून येत्या ४ वर्षात साधारणत: एकूण ३२०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. याकरिता २३ सप्टेंबर २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य शासनाकडून १२०० कोटी रूपये तर १५ व्या वित्त आयोगाकडून २००० कोटी रूपये सहभाग असणार आहे. याद्वारे समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे, भूमिगत विद्युत वाहिन्या, चक्रीवादळ केंद्रे, निवारा केंद्रे बांधणी आदींचे नियोजन असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
कोकणातील सिंधुदुर्ग,रायगड,रत्नागिरी,ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यात समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याकरिता जिल्हाधिकार्यांकडून १४०० कोटी रूपयांचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून येत्या १५ दिवसात त्यास परवानगी देण्यात येईल. प्रस्ताव मंजुरीनंतर त्यासंदर्भातील निविदा काढून पुढील २-३ महिन्यात कामाची सुरूवात करण्यात येईल,असे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले. यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री विजय उर्फ भाई गिरकर,जयंत पाटील,अनिकेत तटकरे,प्रसाद लाड,विनायक मेटे,रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केला होता.