मुंबई :
कोरोनामुळे राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणार्या मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वये प्रशासनाकडून चालवण्यात येणार्या विशेष एक्स्प्रेस गाड्यांमध्ये फक्त आरक्षित तिकिटावर प्रवास करता येत होता. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणार्या नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. मात्र आता मध्य रेल्वेने डेक्कन, इंटरसिटी, इंद्रायणी आणि सिंहगड या चार एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना जनरल तिकिटांवर प्रवास करण्याची मुभा दिली आहे. ही मुभा २२ मार्चपासून लागू करण्यात येणार आहे, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन करून फक्त विशेष एक्स्प्रेस गाड्या चालवण्यात येत होत्या. मात्र या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकिट आरक्षित करावे लागत असे. त्यामुळे अचानक प्रवासाला निघणार्या प्रवाशांची गैरसोय होत होती. मुंबई ते पुणे प्रवास करणार्यांची प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत होता. त्यातच मागील साडेचार महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचा संप असल्याने मुंबई ते पुणे प्रवास करणार्या नागरिकांना प्रंचड आर्थिक फटका सहन करावा लागत होता. मात्र आता मध्य रेल्वेने मंगळवारपासून मुंबई ते पुणे धावणार्या डेक्कन, इंद्रायणी, इंटरसिटी व सिंहगड या चार एक्स्प्रेसमधून प्रवाशांना जनरल तिकिटावरून प्रवासाची मुभा दिली आहे. मुंबई ते पुणे धावणार्या या चार एक्स्प्रेसमध्ये पुन्हा जनरल तिकिटाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने दोन वर्षानंतर घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.