मुंबई :
मुंबई विद्यापीठाकडून शुक्रवारी घेण्यात आलेल्या पेट परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये विद्यार्थ्यांना तातडीने निकाल देण्यात आला. मात्र या निकालावर ८ महिन्यांपूर्वीची तारीख असल्याने विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. प्रमाणपत्रावर परीक्षा १७ डिसेंबरला झाली असून, प्रमाणपत्र जाहीर करण्याची तारीख १६ एप्रिल २०२१ अशी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे परीक्षेमध्ये गोंधळ घालण्याचा विद्यापीठाचा नियम कायम ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे.
पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांसाठी पेट परीक्षा महत्त्वाची असते. मुंबई विद्यापीठाकडून यंदाच्या वर्षातील दुसरी पेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. या परीक्षेचा मानव्यविद्याशाखेचा पहिला पेपर १७ डिसेंबरला सकाळी १० ते १२ दरम्यान ऑनलाईन झाला. मानव्यविद्याशाखेतून पीएचडी करण्यासाठी उत्सूक असलेल्या १,१३२ विद्यार्थ्यांनी पेट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. वेळापत्रकानुसार परीक्षा झाली, मात्र परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच त्यांच्या लॉगिनमध्ये परीक्षेचा निकाल दाखवण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण पीएचडीसाठी पात्र आहोत की नाहीत, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी प्रमाणपत्रावर निकाल जाहीर करण्याची तारीख ही १६ एप्रिल २०२१ अशी देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. परीक्षा आज दिली आणि आठ महिन्यांपूर्वीच्या तारखेचा निकाल कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. मात्र पुढील काहीवेळात विद्यापीठाकडून लिंक बंद करण्यात आली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना निकाल मिळाला नाही, त्यांच्यामध्ये संभ्रम अधिकच वाढला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी यासंदर्भात विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांकडे धाव घेतली. त्यामुळे आता पुढील पेपर सुरळीत होतील का असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे हा गोंधळ झाला. मात्र फार कमी विद्यार्थ्यांना निकालपत्र मिळाले आहे. परंतु हे निकालपत्र नसून, ठरलेल्या दिवशी योग्य निकाल जाहीर करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना चुकून निकाल गेला आहे. त्यांना यासंदर्भात कळवून त्यांचा संभ्रम दूर करण्यात आला आहे.
- डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
पेट परीक्षेतील गोंधळामुळे विद्यापीठाने आपली गोंधळाची परंपरा कायम ठेवली आहे. परीक्षा घेण्यापूर्वी त्यांनी प्रात्याक्षिक घेणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडला आहे. परीक्षेची जबाबदारी दिलेल्या कंपनीवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
– डॉ. धनराज कोहचाडे, अधिसभा सदस्य, युवासेना