मुंबई :
समर्थ रामदास स्वामींचे इतिहासकालीन वास्तव्य व समर्थांचा असलेला मठ यामुळे श्री क्षेत्र रामदास पठार या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे गाव प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित राहिले आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावामध्ये विकास कामे करावीत यासाठी ग्रामस्थांनी स्थानिक आमदार भरत गोगावले यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथ लिहिलेल्या शिवथर घळीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या रामदास पठार या गावांमध्ये समर्थांचे वास्तव्य होते. तेथे त्यांचा मठही आहे. या मठावर असलेल्या समर्थांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात, तसेच या मठावर भाविकांकडून ध्यानधारणा ही केली जाते. रामदास पठार या गावाला राज्य सरकारने पर्यटनाचा ‘क’ दर्जा दिला असतानाही गावाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला जात नाही तसेच गावात विकास कामेही केली जात नाही. प्राथमिक सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या या गावांमध्ये भाविकांना तसेच ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रामदास पठार येथील ग्रामपंचायतीला अल्प महसूल उपलब्ध होत असल्यामुळे मोठी कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना ग्रामस्थांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. त्यामुळे गावातील विहीरीच्या ठिकाणी आर.सी.सी. तलाव बांधणे, एस.टी. स्टँड ते समर्थ रामदास स्वामी मंदिरापर्यंत रस्ता बनवणे, गावाअंतर्गत रस्ते बनवणे, जुनी नळ पाईपलाईन दुरुस्त करणे आदी विकासकामे आमदार निधीतून तसेच शासनाच्या अन्य निधीतून करून देण्यात यावी, अशी विनंती श्री क्षेत्र रामदास पठारच्या ग्रामस्थांनी महाड-पोलादपूर–माणगांव विधानसभेचे आमदार भरत गोगावले यांना निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी शशिकांत नलावडे, रामचंद्र रेणोसे, आत्माराम डिगे, अरुण डिगे, नारायण डिगे, प्रकाश नलावडे, विनोद नलावडे आणि विशाल नलावडे उपस्थित होते