मुंबई :
महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने ८ मार्च रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर हाॅल या ठिकाणी मुंबई कवयित्री सम्मेलन आणि कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक डाॅ. अनुपमा उजगरे व स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त योगिनी राऊळ प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. उमा बापट यांनी आपल्या शैलीदार भाषेत निवेदन केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मार्गदर्शिका कै. संजीवनी रायकर यांच्या प्रतिमेस प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अनुपमा उजगीरे यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रातील एकूण २५ कर्तृत्त्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महिला तबलावादक अनुराधा पाल, अस्मिता सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त सुधा तेंडूलकर अशा मान्यवर महिलांचा समावेश होता. त्याचबरोबर सहभागी कवयित्रींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
उजगिरे यांनी नवोदित कवयित्रींना कविता लेखन करताना घ्यावयाची काळजी तसेच सादरीकरण करताना उच्चार व कवितेतील भाव आपल्या सादरीकरणात कसा आणावा, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच योगिनी राऊळ यांनी स्त्रीमुक्ती व स्त्री चळवळ याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी २५० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. शेवटी शिक्षक परिषदेच्या अध्यक्षांनी अध्यक्षीय भाषणातून कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा यांनी दिली.