मुंबई :
मुंबईकरांना तणावमुक्त व आरोग्यदायी वातावरणात आठवड्यातील किमान काही तास तरी घालवता यावेत या हेतूने मुंबई पोलिसांनी ’संडे स्ट्रीट’ ही संकल्पना आजपासून राबवण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील मुंबईच्या रस्त्यांवर जॉगिंग करताना दिसले. तर दुसरीकडे मुंबईतील विविध भागांमध्ये देखील हा उपक्रम राबविण्यात आला. विक्रोळी येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईकरांना रस्त्यावर येऊन मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलिंग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत या करीता’संडे स्ट्रीट’ ही संकल्पना मुंबई पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय दराडे, पूर्व परिक्षेत्र वाहतूक पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, परिमंडळ-७ चे पोलीस उप आयुक्त प्रशांत कदम, घाटकोपर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त आनंद नेर्लेकर, वाहतूक पूर्व द्रुतगती महामार्गाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश शिंदे तसेच विक्रोळी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा चव्हाण यांच्या हस्ते हिरवेे झेंडे दाखवून सुरूवात करण्यात आली. यावेळी फिटनेस ग्रुपचे सदस्य, जॉगर्स, सायकल रायडर्स १०० ते १५० लोक उपस्थित होते. यावेळी दिशा ग्रुपचे दिनेश बैरीशेट्टी आणि सामाजिक कार्यकर्ते विलास पारकर यांनी विशेष सहकार्य केले.
काय आहे संडे स्ट्रीट ?
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुंबई पूर्वपदावर आली आहे. निर्बंधांमुळे गेले दोन वर्ष धावती मुंबईला ब्रेक लागला होता. अनेकजण ताण तणावात जीवन जगत आहेत. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून संडे स्ट्रीट हा उपक्रम सुरू झाला आहे. मुंबईतील १३ रस्त्यांवर सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत आज राबवला जाणार आहे. सकाळपासूनच या उपक्रमाला मुंबईकरांनी काही ठिकाणी गर्दी केली होती तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.