Voice of Eastern

मुंबई : 

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकच्या कोणत्याही अभ्यासक्रमाच्या थेट दुसर्‍या वर्षाला प्रवेश घेता येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसंदर्भात अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आयटीआयमधून प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊन पदवी घेता येते, परंतु आतापर्यंत आयटीआयमधून ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केले त्याच ट्रेडमध्ये पॉलिटेक्निकच्या दुसर्‍या वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे, मात्र या निणर्र्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आता बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार आयटीआयमधून व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेता येणार आहे. या निर्णयाचा फायदा साधारणपणे आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताची असते. या पार्श्वभूमीवर त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

दहावीचा निकाल लागण्यास अद्याप अवधी आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाचे अनावरण वडाळा विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात करण्यात आले. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर दहावीचा निकाल लागल्यानंतर त्यांची माहिती थेट पोर्टलवर अपलोड होणार आहे. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले होते. त्याचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव

कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना पदविका प्रवेशासाठी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेतील प्रत्येक शाखेत प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोन जागा राखून ठेवण्याचा निर्णयही उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. राज्यामध्ये पॉलिटेक्निकची ३६५ महाविद्यालये असून प्रत्येक महाविद्यालयामध्ये जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या मुलांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम केअर्स योजनेंतर्गत त्यांना ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Related posts

विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई विद्यापीठाकडून अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव

Voice of Eastern

पश्चिम रेल्वेचे ‘झिरो डेथ मिशन’

Voice of Eastern

Leave a Comment