Voice of Eastern

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये एमएमएस अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचा मोठा गाजावाज करण्यात आला. मात्र या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेची परीक्षा तोंडावर आली असताना ती अनिश्चित काळासाठी रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे. महत्त्वाच्या परवानगी घेण्यापूर्वीच विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केलेल्या घाईमुळे त्याचा शेकडो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) हा अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी देत ७२० जागांना मान्यता दिली होती. अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी २९ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यात आली होती. एमएमएस या अभ्यासक्रमासाठी ५८४ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ५ डिसेंबरला ऑनलाईन पद्धतीने होणार होती. मात्र एमएमएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी युजीसी व एआयसीटीईने मान्यता दिली असली तरी काही महत्त्वाच्या परवानग्या मिळवणे अद्याप बाकी होते. असे असतानाही विद्यापीठाने प्रवेश परीक्षा घेण्याची केलेली घाई त्यांच्या अंगलट आली आहे. आवश्यक परवानगी न घेतल्याने युजीसीने प्रवेश परीक्षा घेण्यावर स्थगिती आणली आहे. त्यामुळे एमएमएसच्या प्रवेश परीक्षेला काही दिवस असतानाच आयडॉलवर परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे एमएमएस परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा युवासेना अधिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी निषेध करत एमएमएस हे अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व परवानगी घेणे अपेक्षित होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले नसते, असे सांगितले. तसेच एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात आणि परीक्षेच्या पाच दिवस अगोदरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निवेदन अ‍ॅड. वैभव थोरात यांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना दिले आहे.

काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. युजीसीच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. लवकरच परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.
- विनोद माळाळे, जनसंपर्क अधिकारी, आयडॉल

एमएमएस हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. विद्यापीठाच्या दिरंगाई व हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया तातडीने सुरू करावी. विद्यापीठाला अ++ गुणांकन मिळूनही विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारात सुधारणा झाली नाही, हे दुर्दैवी आहे.
– अ‍ॅड. वैभव थोरात, अधिसभा सदस्य, युवासेना

 

Related posts

आता कमी किंमतीत होणार गुडघ्याची शस्त्रक्रिया

Voice of Eastern

कोरोना मृतांच्या कुटुंबियांचे चार हजार अर्ज अपात्र

‘फास’मध्ये होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

Leave a Comment