मुंबई :
प्रवासादरम्यान महिलांना स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकिन अशा समस्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे स्थानकांवर उपलब्ध नसल्याने त्यांची प्रचंड कोंडी होती. ही बाब लक्षात घेऊन मेट्रो रेल्वेकडून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील घाटकोपर मेट्रो स्थानकामध्ये महिला प्रवाशांसाठी १ फेब्रुवारीपासून ‘पावडर रूम लाऊंज’ची विशेष सुविधा सुरू केली आहे.
मुंबईतील मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातही एकूण प्रवाशांपैकी ४१ टक्के महिला प्रवासी आहेत. त्यामुळे महिलांचा प्रवास सुखर आणि आनंदायी व्हावा यासाठी मेट्रो रेल्वेकडून विमानतळाच्या धर्तीवर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील घाटकोपर मेट्रो स्थानकांत ‘पावडर रूम लाऊंज’ची विशेष सुविधा सुरु केली आहे. घाटकोपर मेट्रो स्थानकातील पावडर रूममुळे महिलांना स्मार्ट आरोग्यपूर्ण, स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे उपलब्ध झाली आहेत. या पावडर लाऊंजमध्ये सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सर, कॅफे आणि महिलांच्या विविध स्वच्छता व वेलनेस उत्पादनांचे रिटेल आउटलेटही उपलब्ध असणार आहे. घाटकोपर मेट्रो स्थानकांचा पोटमाळ्यावर तब्बल एक हजार चौरस फुटांवर हे विशेष लाऊंज विस्तारलेले आहे. पावडर रूम लाऊंजमध्ये वातानुकुलित यंत्रणा, वाय-फाय, आठ स्मार्ट स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित टॉयलेट, सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर आदी सुविधा असणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांचे डायपर बदलण्याची सोय, १४ आसनांचा एक कॅफेही आतमध्ये असणार आहे.
कशी उपलब्ध होईल सेवा
पावडर रूम लाऊंजचा वापर करण्यासाठी महिलांना एक अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. हे पावडर रूम लाऊंज एका महिन्यासाठी विनाशुल्क असणार आहे. त्यानंतर महिलांना एक वर्ष सेवेची सदस्यता घ्यावी लागणार आहे. यामध्ये दिवसाला एक रुपयांप्रमाणे वर्षाला ३६५ रुपये भरावे लागणार आहेत. ही प्रीमियम सुविधा सकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत उपलब्ध असणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या वॉशरूम सुविधेव्यतिरिक्त ही सुविधा पुरवण्यात येणार आहे.
ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य टाळले