मुंबई :
नेहमीच आपल्या विविधांगी भूमिकांमुळे चर्चेत राहणारा प्रथमेश परब आपल्या आगामी व्हिडिओमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. प्रथमेशला आता ‘लग्नाची घाय’ लागली आहे. ‘लग्नाची घाय’ हे प्रथमेशचं गाणं रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. लय भारी म्युझिकचं हे गाणं सर्वांनाच ताल धरायला लावणार आहे.
‘बॅायफ्रेंड पक्का सेल्फीश…’ या गाण्याच्या यशानंतर निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी लय भारी म्युझिकच्या बॅनरखाली ‘पोरीला लागलेय लग्नाची घाय…’ हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींसाठी आणलं आहे. लय भारी म्युझिकच्या ‘बॅायफ्रेंड पक्का सेल्फीश…’ या गाण्याला अवघ्या दोन महिन्यांमध्ये १ लाख ३५ हजार इन्स्टाग्राम रील्स आणि १० मिलियन्स व्ह्यूज आहेत, यावरून या गाण्याचं यश अधोरेखित होत आहे. त्यामुळेच लय भारी म्युझिकने आता ‘पोरीला लागलेय लग्नाची घाय…’ हे गाणं आणलं आहे. या गाण्यात प्रथमेशच्या जोडीला कोमल खरात हा नवा चेहरा असून, प्रथमेश-कोमलची यांची गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना मोहिनी घालणारी आहे. प्रथमेश आणि कोमलचा डान्स सर्वच वयोगटातील रसिकांना आकर्षित करणारा आहे. लय भारी म्युझिकचे चॅनेल हेड बॅाब आणि कोमल यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. गीतकार राज इरमाली यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेले हे गाणं राज इरमाली आणि सोनाली सोनावणे यांच्या आवाजात स्वरबद्ध केलं आहे. किशोर दळवी यांनी कोरिओग्राफी केली आहे.