मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना पालिका रुग्णालये, जंबो कोविड सेंटरमध्ये आरोग्य विभागाच्या अंतर्गत नेमलेल्या कंत्राटी कर्मचार्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. याची दखल घेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी भविष्यात पालिका आरोग्य विभागातील ३२ हजार रिक्त पदे भरतांना या कंत्राटी कर्मचार्यांचा प्राधान्याने विचार करणार येईल, असे सूतोवच केले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद पडलेली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक तब्बल २१ महिन्यांनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ऑनलाईन स्वरूपात झाली. यावेळी कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेप्रसंगी डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण पाहता भविष्यात रिक्त पदे भरताना कोविड काळात उत्तम कामगिरी केलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय गटनेते यांनी व्यक्त केली. त्यावर पालिका आयुक्तांनी सकारत्मकता दर्शवली. त्यामुळे पालिकेत भविष्यात आरोग्य विभागात कर्मचार्यांची भरती झाल्यास सदर कंत्राटी कर्मचार्यांना नववर्षात नोकरीची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.