Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

आयडॉलच्या प्रश्नांवर सहावेळा स्थगन आणूनही समस्या जैसे थे! – सिनेट सदस्य आक्रमक

banner

मुंबई :

मुंबई विद्यापीठाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या आयडॉलमध्ये नवनवीन अभ्यासक्रम सुरू करणे, आयडॉलचे उपकेंद्र सुरू करणे, परीक्षा केंद्र, प्राध्यापक भरती, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे या प्रश्नांसाठी सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी यावर्षीच्या अधिसभेमध्ये पुन्हा स्थगन प्रस्तावाद्वारे प्रश्न उपस्थित केला. मात्र आयडॉलच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणाचे आश्वासन देऊन त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या कुलुगरूंकडे कोणतेही उत्तर नसल्याने सर्वच सिनेट सदस्य आक्रमक झाले. आयडॉलमधील सुधारणांसाठी थोरात यांनी तब्बल सहावेळा स्थगन प्रस्ताव सादर करूनही विद्यापीठाच्या ढिम्मपणावर सिनेट सदस्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

आयडॉल या दूरस्थ शिक्षणाची सोय असलेल्या विद्यापीठाच्या कलिना संकुलातून नोकरी करणारे लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. आयडॉलमधील विद्यार्थी प्रवेश नोंदणीतून मुंबई विद्यापीठाला कोट्यवधीची उत्पन्न मिळते. मात्र या विभागाकडे मुंबई विद्यापीठाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणून कुलुगरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या कालावधीत आयडॉलमधील विद्यार्थी संख्या ८० हजारांहून ६५ हजारांवर आली. अन्य खासगी विद्यापीठांमध्ये दूरस्थ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत लाखोच्या संख्येने वाढ होत असताना आयडॉलमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याचे थोरात यांनी सभागृहाच्य निदर्शनास आणून दिले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयेच आयडॉलला परीक्षा केंद्र देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नवीन अभ्यासक्रम सुरू करणे आणि प्राध्यापक भरतीकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी कुलगुरूंवर जोरदार टीका केली. मागच्या सिनेटमध्ये कुलगुरूंनी आयडॉलचे सक्षमीकरण व विस्तारीकरण करण्याच्या आश्वासनाला कुलगुरूंकडूनच केराची टोपली दाखवल्याचा आरोपही त्यांनी केला. वैभव थोरात यांनी उपस्थित केलेल्या स्थगन प्रस्तावाला डॉ. धनराज कोहचाडे यांनी अनुमोदन दिले. तसेच आयडॉलकडे विद्यापीठाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या मुद्द्यावर सिनेट सदस्य महादेव जगताप, प्रवीण पाटकर, डॉ. सुप्रिया करंडे, शशिकांत झोरे यांनीही कुलगुरूंना धारेवर धरले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनीही आयडॉलमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असलेल्या मुद्द्यावर बोट ठेऊन सध्या स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून जाहिरातींवर खर्च का करण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित करत आयडॉलमधील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी जाहिरातींवर अधिकाधिक खर्च करण्याचा मुद्दा लावून धरला.

Related posts

३० जून हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खो खो दिन साजरा करा : डॉ. चंद्रजित जाधव

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १७ लाखांपेक्षा अधिक प्रकरणे निकाली

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग – दीपक केसरकर 

Voice of Eastern

Leave a Comment