मुंबई :
‘समावेशन झालेच पाहिजे’ ‘कोविड योद्ध्यांना न्याय द्या’ ‘अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना स्थायी करा’ या घोषणेने गुरुवारी सायंकाळी जे.जे. रुग्णालयाचा परिसर दणाणून गेला. अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना कायम करण्याच्या मागणीसाठी राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कँडल मार्च काढत जोरदार घोषणा दिल्या. १७ जानेवारीपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणात २०० पेक्षा अधिक प्राध्यापक सहभागी झाले होते.
राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ रुग्णालयात सेवा देत आहोत. लाखो रुग्णांचे प्राण वाचवत आहोत. हजारो विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. शैक्षणिक कामकाजाबरोबर इतर अनेक प्रशासकीय कामे करत आहोत. तरीपण सरकारकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आमच्याकडून वर्षानुवर्षे अस्थायी स्वरुपात काम करून घेत आहे. आम्ही खाजगी रुग्णालयात लाखो रुपये कमावू शकतो, अन्य राज्यात जाऊन सेवा देऊ शकलो असतो, पण आपल्या मातीची, आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही कित्येक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करत आहोत. तसेच आम्हाला दरवेळी फक्त आश्वासन देत आमच्या संयमाचा सरकारकडून अंत पाहण्यात येत आहे. अनेकांना चार महिन्यांच्या ऑर्डवर काम करताना पुढील ऑर्डर निघेल की नाही याची चिंता भेडसावत असते, आमच्या अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवले जात असल्याने महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातून आम्ही सगळे साखळी उपोषण करत असल्याची माहिती डॉ. प्राजक्ता थेटे यांनी दिली. आमच्या आयुष्यातील अनिश्चिततेचा अंधकार दूर व्हावा व लवकरात लवकर आम्हाला शासनात समावेश करा, आमच्या मागण्यांना न्याय मिळावा असे मत यावेळी वैद्यकीय शिक्षकांनी व्यक्त केले. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा असाच चालू राहणार, असे कँडल मार्चच्या वेळी डॉक्टरांकडून सांगण्यात आले.