मुंबई :
रेबिज प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ४ या पहिल्या सत्रात रेबिज लसीकरण उपलब्ध असते. आता निवडक दवाखान्यांमध्ये दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत रेबिज प्रतिबंधक लस रुग्णांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यासाठी सुमारे ३०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
रेबिज या रोगाचे निर्मूलन २०३० पर्यंत करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. श्वान दंशानंतर रेबिज प्रतिबंधक लसीकरण व रेबिज प्रतिबंधक उपाययोजना, भटक्या तसेच पाळीव प्राण्यांचे रेबिज प्रतिबंधक लसीकरण, भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आदी उपाययोजन हाती घेतल्या आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने उपाययोजनांची आखणी केली आहे.
सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत रेबिज लसीकरण करण्यात येते. मात्र यापुढे काही निवडक दवाखान्यांमध्ये सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत या दुसऱ्या सत्रात देखील रुग्णांना रेबिज लस विनामूल्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यातून रेबिज रोखण्यासाठी मदत होणार आहे. तसेच जागतिक रेबिज दिन निमित्ताने महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे ३०० हून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना रेबिज आजाराच्या नियंत्रणासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत २९ सप्टेंबर २०२३ रोजी प्रशिक्षण दिल्याचे आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.
कोणामुळे होतो रेबिज
रेबिज हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. प्रामुख्याने श्वान, मांजर, घोडा, बकरी, माकड व अन्य प्राण्यांच्या चाव्यानंतर हा आजार होतो. रेबिज हा शंभर टक्के प्राणघातक असल्यामुळे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी वेळेत लसीकरण हा एकमेव उपचार आहे.
पाळीव प्राण्यांच्या मालकांनी घ्यावयाची काळजी
आपल्या पाळीव प्राण्यांचे नियमितपणे रेबिज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.
संभाव्य संक्रमित प्राण्यांचा संपर्क होण्याचा धोका कमी करण्यासाठी आपल्या पाळीव प्राण्यांना घरात किंवा सुरक्षित भागात ठेवले आहे, याची खात्री करा.
एखाद्या प्राण्याने चावा घेतला तर
- कमीत कमी १५ मिनिटे साबण आणि पाण्याने जखम स्वच्छ धुवा.
- त्वरित वैद्यकीय मदत घ्या. कारण लवकर उपचार केल्यास रेबिजचे संक्रमण टाळता येते.
- रेबिज प्रतिबंधक लसीकरणामध्ये त्वचेखाली दोन्ही दंडावर लसीची १ मात्रा इंजेक्शनद्वारे ०, ३, ७ आणि २८ व्या दिवशी देण्यात येते. तसेच धनुर्वात लसीची एक मात्रा रेबिज लसीच्या पहिल्या मात्रेबरोबर देण्यात येते. या सर्व मात्रा खंड न पडता वेळापत्रकाप्रमाणे नियमितपणे घेऊन लसीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
- रात्री कुत्रा चावल्यास जखम व्यवस्थापन आणि लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या अपघात विभागाशी संपर्क साधावा.
- भटक्या जनावरांशी संपर्क टाळा आणि जनावराने चावा घेतल्यास किंवा खरचटल्यास महानगरपालिकेच्या दवाखाने/रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- संभाव्य रेबिज संक्रमित झालेल्या प्राण्यांशी संपर्क टाळा आणि त्यांना हाताळण्याचा किंवा खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका.
- स्थानिक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना विनंती केली जाते की, त्यांनी कोणत्याही प्राण्यांच्या चावण्याची किंवा खरचटल्याची माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला द्यावी.