मुंबई :
बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारात वाढ होत असताना मुंबईत शनिवारी सकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघरमधील अनेक ठिकाणी रिपरिप पाऊस पडला. त्यामुळे आता स्वेटर वापरायचा की छत्री अशी भावना मुंबईकरांनी व्यक्त केली.
भारतीय हवामान विभागाने ७ ते ११ जनेवारीदरम्यान राज्यात गारपीटसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली, कांदिवली, सांताक्रुझ या भागांत रिमझिम पाऊस पडला. ९ जानेवारीला विदर्भामध्ये गारपिटीची तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
उत्तर भारतातील हवामान बदलामुळे पुढील दिवस अरबी समुद्रातून आद्रता राहणार आहे. यामुळे मध्य भारतात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून वारे एकत्र येतील, असे ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केले आहे.