मुंबई :
कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने भायखळा येथील राणीच्या बाग १ नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांना खुली करण्यात आली. १ नोव्हेंबर २०२१ ते १० मार्च २०२२ दरम्यान लहान मुले, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा सहा लाख पर्यटकांनी भेट दिली. या चार महिन्यांमध्ये पालिकेच्या तिजोरीत पर्यटकांच्या या प्रतिसादामुळे अडीच कोटी रुपयांची आर्थिक भर पडली आहे.
१ नोव्हेंबर रोजी राणीची बाग सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली असली तरी १ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राणीची बाग बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे चार महिन्यात पालिकेच्या तिजोरीत अडीच कोटींचे उत्पन्न जमा होणे, ही आश्चर्याची बाब मानली जात आहे. सध्या दररोज सहा ते सात हजार पर्यटक तर शनिवार व रविवार किमान २० ते २१ हजार पर्यटक राणीच्या बागेला भेट देऊन पक्षी व प्राणी यांसह पेंग्विन पाहण्याचा आनंद लुटत आहेत.
१ नोव्हेंबर २०२१ ते १० मार्चपर्यंत तब्बल ५ लाख ९४ हजार ३५८ पर्यटकांनी शक्ती, करिश्मा, अस्वल, हरणांना जवळून पाहिले. या पर्यटकांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या तिजोरीत २ कोटी ३७ लाख २२ हजार ३५५ रुपयांचे उपसन्न जमा झाल्याची माहिती राणी बाग प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.