मुंबई :
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने घराघरात पोहोचलेले अण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर आता एका वेगळ्या रूपात चाहत्यांसमोर येणार आहेत. ‘गुल्हर’ या आगामी मराठी चित्रपटात माधव अभ्यंकरांचा लुक रसिकांना नक्कीच भावणार आहे.
आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली शांताराम (आप्पा) मेदगे, अनुप शिंदे, शिवाजी भिंताडे आणि अबिद सय्यद यांनी ‘गुल्हर’ची निर्मिती तर दिग्दर्शन रमेश चौधरी यांनी केले आहे. धनगर समाजातील ११ वर्षांच्या मुलावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे. यात माधव अभ्यंकर यांनी साकारलेली भूमिका अत्यंत महत्त्वाचं असल्यानं त्यांना धनगर लुक देण्यात आला आहे. डोक्याला गुलाबी फेटा, पांढरा सदरा, धोतर, उजव्या हातात कडं, डाव्या खांद्यावर उपरणं, हातात घुंगरू लावलेली काठी, गळयात तावीज, झुपकेदार मिशा आणि हळदीनं भरलेला मळवट असं काहीसं माधव अभ्यंकरांचं रुपडं ‘गुल्हर’मध्ये दिसणार आहे.
माधव अभ्यंकरांसोबत भार्गवी चिरमुले, विनायक पोद्दार, रवी काळे, सुरेश विश्वकर्मा, शिवानी बावकर, रुक्मिणी सुतार, शिवाजी भिंताडे, किशोर चौगुले, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, गणेश कोकाटे, कपिल कदम, स्वप्निल लांडगे, पुष्पा चौधरी, रेश्मा फडतरे, देवेंद्र वायाळ आणि सचिन माळवदे अशी मराठीतील दमदार स्टारकास्ट आहे. ‘गुल्हर’साठी मोहन पडवळ यांनी कथालेखन तर, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. कुमार डोंगरे यांनी छायालेखन व संकलन तर, नृत्य दिग्दर्शन विशाल पाटील यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी संभाळलेली आहे.