मुंबई :
अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीला यंदा विक्रमी नोंदणी झाली आहे. आतापर्यंत ५ लाख ९९ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी पर राज्याबाहेरील विद्यार्थी १६ हजार ५५० विद्यार्थी आहेत. तर राज्यातील ५ लाख ८३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
एमएचटी सीईटीच्या परीक्षांच्या तारखा एकसमान तसेच विद्यापीठ परीक्षामुळे सीईटी सेलने एमएचटी सीईटीची परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. एमएचटी सीईटी – पीसीएम ग्रुप – ५ ते ११ ऑगस्ट तर पीसीबी ग्रुप – १२ ते २० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी केली आहे. पीसीएम ग्रुपच्या परीक्षेसाठी राज्यातून २ लाख ६४ हजार ९३८ विद्यार्थी तर परराज्यातून १३ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. पीसीबीसाठी अधिक विद्यार्थी असून ३ लाख २१ हजार ३१९ विद्यार्थी आहेत. त्यापैकी राज्यभरातील ३ लाख १८ हजार १२८ आणि राज्याबाहेरचे ३ हजार १९१ आहेत. पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी राज्यातून ५ लाख ९९ हजार ६१६ विद्यार्थी तर परराज्यातून १६ हजार ५५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
यावर्षी जसा राज्यातील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे. तसाच परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. उत्तर प्रदेश मधून सर्वाधिक २ हजार ६७५, मध्य प्रदेशमधून २ हजार ५६५, बिहार २ हजार ३३४, या राज्यातून सर्वाधिक नोंदणी विद्यार्थ्यांनी केली आहे.