मुंबई :
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय व्हावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा परीक्षेत अनेक अडचणी आल्या असल्यातरी २०२१-२२ साठी होणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेसाठी तब्बल ५ लाख ४६ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ३१ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
२०२१-२२ साठी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या नोंदणीसाठी १ डिसेंबरपासून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेला नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षीच्या परीक्षेला फारच कमी नोंदणी झाली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल ५ लाख ४६ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये इयत्ता ५ वीच्या राज्यातील ३८ हजार ७३४ शाळांमधील ३ लाख १६ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील २ लाख १९ हजार ७ विद्यार्थ्यांना शुल्क भरून आपली नोंदणी निश्चित केली आहे, तर ९७ हजार ३५४ विद्यार्थ्यानी अद्याप शुल्क भरलेले नाही. त्याचप्रमाणे इयत्ता राज्यातील ३८ हजार ७३५ शाळांमधील २ लाख २९ हजार ८८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील १ लाख ३७ हजार ९४८ विद्यार्थ्यांना शुल्क भरून आपली नोंदणी निश्चित केली आहे, तर ९१ हजार ९४१ विद्यार्थ्यानी अद्याप शुल्क भरलेले नाही. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार असून, नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याना १ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत शुल्क भरता येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
२०२०-२१ चा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात
कोरोना प्रादुर्भाव आणि विविध कारणांमुळे २०२०-२१ ची शिष्यवृत्ती परीक्षा वारंवार पुढे ढकलावी लागली होती. अखेर नोव्हेंबर २०२१ मध्ये मुंबईतील पालिका शाळा वगळता संपूर्ण राज्यात यशस्वीरित्या परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.