मुंबई :
देशात जातनिहाय जनगणना झाली तर धार्मिक उन्माद समाप्त होईल. बिहारने जातनिहाय जनगणना करून देशाला पुढे जाण्याचा रस्ता दाखवला आहे. महाराष्ट्र तर समाजवादाची प्रयोगशाळा आहे. महाराष्ट्र मागे राहणार नाही. २०२४ ला देशात परिवर्तन होणार. त्यासाठी देशातल्या समाजवाद्यांनी सज्ज राहायला हवे, असे आवाहन जनता दल (यूनाइटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी मुंबईत बोलताना केले. जनता दल (यूनाइटेड) च्या संवाद मेळाव्यात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. हा मेळावा अ. भि. गोरेगावकर शाळेच्या हॉलमध्ये, गोरेगाव येथे (१ ऑक्टोबर रोजी) झाला. मेळाव्याची सुरवात महाराष्ट्र गीताने झाली.
केंद्र सरकारने देशातील लोकांचा विश्वास गमावलेला आहे. लोकांच्या डोळ्याला डोळा भिडवून केंद्र सरकार जबाब देऊ शकत नाही. प्रधानमंत्री जनतेचे सेवक नसून इव्हेंट मॅनेजर आहेत. या सरकारला लोकलाज नाही. सर्व प्रकारची दडपशाही करत सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे, या अघोषित आणीबाणी विरुद्ध आपण लढूयात आणि जिंकूयात. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, मधू दंडवते, मृणाल गोरे यांच्या भूमीला समाजवादाच्या रंगाने रंगवून टाका, असं आवाहनही ललन सिंह यांनी जद(यू.) कार्यकर्त्यांना केले.
बिहार सरकारचे जलसंधारणमंत्री संजय कुमार झा, ‘मुंबईकर’ असलेले बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर, जद(यू.) राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील, प्रदेश अध्यक्ष शशांक राव, प्रदेश कार्याध्यक्ष अतुल देशमुख यांची भाषणे यावेळी झाली. मुंबई अध्यक्ष अमित झा यांनी सर्वांचे स्वागत केले. जद(यू.) पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित होते. तिन्ही मान्यवरांचा यावेळी महात्मा फुले यांची पगडी आणि घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. संजय कुमार झा यांनी महाराष्ट्रात जद(यू.) ला अनुकूल वातावरण असून आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता परिवार मोठ्या ताकदीने उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला.
मृणाल गोरे यांना अभिवादन
मेळाव्यापूर्वी ललन सिंह आणि मान्यवर यांनी केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे असलेल्या मृणाल गोरे यांच्या स्मृती दालनाला भेट दिली. मृणाल गोरे यांच्या आठवणी यावेळी जागवल्या. ट्रस्टच्या विश्वस्त यांनी यावेळी मान्यवरांचे स्वागत केले.
दक्षिणेतील समाजवादी नेत्यांची भेट
कर्नाटकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमधील सेक्युलर जनता दलातील प्रमुख नेत्यांनी मुंबईत ललन सिंह यांची भेट घेऊन जद(यू.) मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.