मुंबई :
पहिली ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने मंगळवारी जारी केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० मध्ये राज्यातील सर्व महाविद्यालये बंद करून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर ही महाविद्यालये १३ ऑक्टोबर २०२१ रोजी पुन्हा प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. त्यावेळी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत होता. मात्र कोरोनाची तिसरी लाट आल्याने राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तिसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्येतही घट झाल्याने राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे शाळा सुरू होऊ शकते मग महाविद्यालये का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मान्याता देत राज्यातील सर्व महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी सरकारने जाहीर केला. दरम्यान, स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून विद्यापीठांनी महाविद्यालये सुरू करण्याबाबतचे नियोजन करावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणार्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांनी हेल्पलाइनची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच हेल्पलाइन नंबर इत्यादी स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध करुन द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात परवानगी
ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष महाविद्यालये किंवा विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे. परंतु जे विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी लस घेतलेल्या नाहीत, त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. लस न घेतल्यामुळे वर्गामध्ये उपस्थित राहू न शकणार्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
परीक्षा ऑनलाईनच होणार
राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुरू होणार असले तरी ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत. मात्र त्यानंतर सर्व परीक्षा या परिस्थितीनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात यावे, असे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
वस्तीगृहे टप्प्याटप्प्याने सुरू होणार
राज्यातील सर्व वसतीगृहे टप्याटप्याने सुरु करण्याबाबत संबंधित विद्यापीठ, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण संचालक यांनी आढावा घेऊन व स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करून त्याचे स्तरावर निर्णय घ्यावा, असेही शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.