मुंबई :
शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी नोकरीच्या शोधात असतात, तर शिक्षण घेत नोकरी करणार्या विद्यार्थ्यांना बढतीची संधी असते. मात्र नॅकचे सर्वाधिक गुणांकन मिळवल्याचा डंका पिटणार्या मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे १६ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी वर्षभरापासून पदवी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. पदवी शिक्षण पूर्ण होऊनही चांगली नोकरी किंवा बढतीच्या संधीपासून त्यांना मुकावे लागत आहे. निकालाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वारंवार हेलपाटे मारूनही विद्यार्थ्यांना महाविद्यालय व विद्यापीठाकडून टोलवाटोलवीची उत्तरे देऊन त्यांच्या आयुष्याशी खेळ खेळण्यात येत असल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
देशातील नामांकित विद्यापीठ असलेल्या मुंबई विद्यापीठातून शिक्षण व्हावे यासाठी अनेक विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते. मात्र ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ या उक्तीचा मुंबई विद्यापीठाकडून वारंवार प्रत्यय देण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय वर्षाला एटीकेटी लागल्यास या विषयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांना अंतिम वर्षाचा निकाल दिला जात नाही. या प्रक्रियेला रिझल्ट लोअर एक्झाम नॉट क्लियर (आरएलई) असे म्हटले जाते. विद्यार्थी एटीकेटीच्या विषयांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे सर्व निकाल विद्यापीठाने निकाल देण्यासाठी नियुक्त केलेल्या एमकेसीएल या कंपनीकडे पाठवले जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांना काही दिवसांत निकाल दिला जातो. मात्र विद्यापीठाच्या भोंगल कारभार आणि एमकेसीएल कंपनीवर नसलेले वर्चस्व यामुळे वर्षभरापासून १६ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे आरएलईअंतर्गत असलेले निकालच देण्यात आले नाहीत. अंतिम वर्षाचे निकाल रखडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्य शाखेचे ११ हजार, कला शाखेचे २५०० तर अन्य शाखांचे दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांचे निकाल रखडलेले आहेत. अंतिम वर्षाच्या निकालासाठी विद्यार्थी महाविद्यालय व विद्यापीठाकडे वारंवार खेटे मारतात. विद्यापीठाकडून अद्याप निकाल आला नसल्याचे महाविद्यालयाकडून सांगितले जाते तर विद्यापीठाकडे विचारणा केली असता त्यांना वेगवेगळे अर्ज करण्यास सांगितले. मात्र या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या एमकेसीएलला विद्यापीठाकडून कोणताही जाब विचारला जात नाही. विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे एटीकेटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही १६ हजार विद्यार्थ्यांमधील अनेक विद्यार्थी चांगल्या नोकरीपासून वंचित राहिले आहेत. तर शिक्षण पूर्ण करत नोकरी करणार्या विद्यार्थ्यांना बढतीला मुकावे लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला आहे. विद्यापीठ व महाविद्यालयाकडे वारंवार खेटे मारूनही निकाल मिळत नसल्याने विद्यार्थी मानसिक तणावाखाली येत असून, त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होत असल्याची माहितीही तांबोळी यांनी दिली.
विद्यार्थ्यांना निकालाची दुय्यम प्रत घेण्यासाठी दबाव
निकालासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठ, एमकेसीएल व महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांना खेटे मारण्यास लावून विद्यार्थ्यांना त्रास देण्यात येतो. त्याचवेळी अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून दुय्यमप्रत घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. दुय्यम प्रतीसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारत स्वत:च्या चुकीचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये आरएलईअंतर्गत येणारे निकाल रखडण्याची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांना तातडीने निकाल मिळावा यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र विभाग स्थापन करून विद्यार्थ्यांची समस्या सोडवावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
– सुधाकर तांबोळी, सिनेट सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आरएलईचे निकाल रखडल्यामध्ये तथ्य आहे. पण ते कशामुळे रखडले आहेत, हे प्रकरण समजल्याशिवाय नेमके कारण सांगू शकत नाही. काही प्रकरणांमध्ये महाविद्यालय, विद्यापीठाकडून काही तांत्रिक बाबी राहिल्या असतील तर काही प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांनी कागदपत्रे वेळेवर सादर केली नसल्याने निकाल देण्यास विलंब होत आहे. पण आम्ही ही सिस्टिम बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर निकाल मिळावा यासाठी महाविद्यालयांसाठी ऑनलाईन सिस्टम तयार करत आहोत.
-विनोद पाटील, परीक्षा नियंत्रक, मुंबई विद्यापीठ