मुंबई :
मुंबई उपनगरासह ठाण्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राजावाडी रुग्णालयाच्या रस्त्यामध्ये काही दिवसांपासून गर्दुल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे गर्दुल्ले रस्त्याने जाणार्या एकट्या महिलेवर किंवा पुरुषावर हल्ले करून लुटमार करत आहेत. त्यामुळे रुग्णालयाती कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आपला जीव मुठीत घेऊन रुग्णालय गाठावे लागत आहे.
विद्याविहार येथे असलेले राजावाडी रुग्णालयामध्ये जाण्यासाठी रेल्वे स्थानकापासून दोन रस्ते आहेत. विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या कुर्ला दिशेच्या पुलावरून उतरून मुख्य रस्त्याने जाता येते. तर दुसरा रस्ता हा घाटकोपर दिशेच्या पुलावरून बाहेर पडून जाता येते. हा रस्ता रुग्णालयात जाण्याचा सर्वात जवळचा रस्ता असून, या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. तसेच या मार्गावर लाईट व सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याने काही दिवसांपासून या मार्गावर चोर,गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. या मार्गावरून जाणार्या एकट्या,दुकट्या महिला व पुरुषांवर हल्ला करत लुटमार करत आहेत. मागील आठवड्यात राजावाडी रुग्णालयात काम करणार्या महिला कर्मचारीला येथे लुटण्यात आले. या घटनेनंतर महिला वर्ग प्रचंड भयभीत झालेला आहे. या घटनेची दखल घेत शिवसेनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाणी, सचिन भांगे यांनी रेल्वे सुरक्षा अधिकारी, स्टेशन मास्तर, पोलीस यांना पत्र देत या मार्गावरील चोर,गर्दुल्ल्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच या मार्गावर रेल्वे सुरक्षा बल वाढवण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत,अशी मागणी केली आहे.
रेल्वेच्या हद्दीतील मोकळ्या जागेवर रेल्वे सुरक्षा बलाची चौकी उभारावी, तसेच रेल्वे हद्दीतील रस्त्याच्या दुतर्फा लाईटची व्यवस्था करावी, विद्याविहार रेल्वे स्थानक हद्दीत सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात यावेत, जेणेकरून चोर व गर्दुल्ल्यांच्या मनात भीती निर्माण होऊन अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल,अशी सूचनाही प्रकाश वाणी यांनी पत्राद्वारे केली आहे.