मुंबई :
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार नगरसेवकांच्या वॉर्डमधील सिमेंट रस्त्यांची लहान, मोठी अशी १ हजार ७२० कोटींची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. यात रस्ते कामांशी संबंधित तब्बल ३९ प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीला येणार असून, यामध्ये पूर्व उपनगरातील ५४७ कोटींची कामे आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापर्यंत रखडलेली रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार मुंबईमध्ये १ हजार ७२० कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पश्चिम उपनगरांत सर्वाधिक ७३० कोटी रुपयांची तर पूर्व उपनगरे भागात ५४७ कोटी रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. सर्वात कमी म्हणजे शहर भागात ४४२ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पालिका काही कंत्राटदारांवर खूप मेहेरबानी झाली आहे. काही कंत्राटदारांना २ तर काहींना ६ कामांची लॉटरी लागली आहे.