Voice of Eastern

आयुष्य एखाद्या कार्याला समर्पित करून, आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे, या ध्येयाने अनेकांना पछाडले जाते. आपल्या अवतीभवती अशी माणसे नेहमीच आढळतात. परंतु, त्यांच्या कार्याबद्द्ल फारशी माहीती आपल्याला नसते. एखाद्या संस्थेसाठी, संघटनेसाठी शेवटपर्यंत आयुष्य वेचणारी माणसे फार कमी सापडतात. रा.स्व.संघाचे स्वयंसेवक रघुनाथ गोवले गुरुजी यांचाही स्वभाव असाच होता. बहुजन समाजात जन्म, लहानपणीच हरवलेले मातृछत्र, पिढ्यानपिढ्या असलेली घरची गरिबी यांनी होरपळलेल्या रघुनाथ गोवले यांना रा. स्व. संघाच्या एका स्वयंसेवकाचा परिसस्पर्श होतो आणि त्यांचे जीवनच बदलते. मुंबईत मुलुंड येथे ते स्थायीक होतात. स्थानिक शाळेत शिक्षक पेक्षा पत्करतात आणि तेथील नागरिकांचा आवडते गोवले गुरुजी बनतात. अयोध्येत राम मंदिर व्हावे म्हणून झालेल्या आंदोलनात कारसेवक म्हणूनही ते सहभाग नोंदवतात. स्वत:च्या मुलालादेखील संघाचा स्वयंसेवक बनवतात आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी या गावी आयुष्याच्या शेवटी जाऊन तेथेही संघाची शाखा चालवतात. संघ आणि समाजकार्य या शिवाय दुसरे काही नाही, असे नसानसात भिनलेल्या आदरणीय आणि संघस्वयंसेवकांना प्रेरणा देणार्‍या गोवले गुरुजींचा आज 28 सप्टेंबर रोजी पुण्यस्मरण दिन. त्या निमित्त त्यांचा जीवनपरिचय उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न.

 

मनुष्य जन्म घेतो. परंतु, नुसता जन्म घेऊन काय फायदा. नाहीतर जन्माला आला आणि मेला इतकेच त्याचे आयुष्य. आपल्या आयुष्याचा कोणाला तरी फायदा झाला पाहिजे, ही भावना प्रबळ हवी. त्यासाठीच निस्वार्थी जगणे हवे. भले समोरचा माणूस आपल्या चांगूलपणाचा फायदा का उठवेना. पण घाबरायचे कशाला. कर नाही…त्याला डर कशाला. तू संकटात आहेस ना! मग मी तुला मदत करणारच. अशीच त्यांची वृत्ती होती. त्यांच्या अशा स्वभावावरून आमच्यात वादही व्हायचे. तरिही ते कधी आपला स्वभाव बदलायचे नाही, असे रा.स्व.संघाचे स्वयंसेवक कै. रघुनाथ गोवले यांच्या पत्नी मैथिली गोवले सांगत होत्या. वयाच्या साठाव्या वर्षी रघुनाथ यांनी जगाचा निरोप घेतला. परंतु, निस्वार्थीपणा शेवटपर्यंत कधी सोडला नाही. त्यांच्या या स्वभावाचा अनेकदा त्रास झाला. पण स्वभावाला औषध नसते, हेच खरे. असे सांगत मैथिली या गोवले गुरुजींच्या आयुष्याविषयी बोलत्या झाल्या.

मुळच्या जन्मापासूनच मुलुंडकर असलेल्या मैथिली या ही शिक्षिका. जुन्या मुलुंडमध्ये बालपण गेलेल्या. त्यांचे माहेरचे नाव लता. लग्नानंतर नाव बदलले. शुध्द शाकाहारी आणि ब्राह्मण समाजातील असलेल्या लता यांचे लग्न कुणबी समाजातील रघुनाथ यांच्याशी झाले. एकीकडे मांसाहार करणारे सासर आणि दुसरीकडे जन्मापासून शाकाहार. अशा दुहेरी पेचात त्या सापडल्या होत्या. परंतु, खाण्यात कसला आलाय भेदभाव. मी शाकाहारी पदार्थ खाईन तुम्ही मासांहार करा, असे म्हणत भिन्न चालीरिती असलेल्या गोवले कुटुंबात त्या स्थिरावल्या.

गोवले गुरुजी यांचे बालपण अतिशय हलाखीत गेले. लहानपणी डॊ. केतकर यांच्यामुळे त्यांचा रा.स्व. संघाच्या शाखेशी संबंध आला. पुढे रत्नागिरीतील कोळथरे येथील संघाचे स्वयंसेवक कृष्णा (मामा) महाजन यांनी त्यांच्यावर संस्कार केले आणि गोवले गुरुजींचे आयुष्यच बदलून गेले. संघ स्वयंसेवकांचा परिसस्पर्श झाल्यावर माणसाच्या जीवनात काय आमुलाग्र बदल होतात. माणसात निस्वार्थी वृत्ती कशी येते, हे गोवले गुरुजींवरून दिसून येते. बालपणीचा काळ मामा महाजनांच्या सानिध्यात घालवला. येथेच त्यांनी संघाचे विचार, संस्कार आत्मसात केले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत जपले. मामा महाजनांनीच त्यांना शिकवले. पुढे रत्नागिरीतील गोगटे महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. केले. यानंतर शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून 1976 साली ते मुलुंड या उपनगरात मेव्हण्याकडे राहायला आले. पुढे त्यांनी न्यू इंग्लीश स्कूल, ठाणे येथे नोकरी केली. नंतर ते मुलुंडच्या ठाकूर नगर विद्यामंदीरमध्ये शिक्षक होते. यानंतर, लोकमान्य विद्यालय या शाळेत त्यांनी शारीरिक शिक्षक म्हणून निवृत्त होईपर्यंत सेवा बजावली. शाळेप्रमाणेच सार्वजनिक जीवनातदेखील रघुनाथ हे गोवले गुरुजीच होते. विवाहापूर्वी त्यांनी ​संघाचे प्रचारक म्हणून रत्नागिरीत कार्य केले.

लहानपणापासून संघ शाखेत जात असल्याने पुढे मुंबईला आल्यानंतरही त्यांनी मुलुंडमध्ये संघकार्य सुरू ठेवले. मुलुंडमध्ये संघ रुजवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. जागोजागी त्यांनी संघ शाखा सुरू केल्या. झोपडपट्ट्यांमध्ये जाणे, तेथे जाऊन मुलांच्या पालकांना संघ, देशसेवा, शिक्षण, संस्कार याबाबत सांगणे आणि संघशाखेतच कसा मुलांचा बौध्दीक विकास, शारिरीक, मानसिक विकास होऊ शकतो हे ते पटवून देत. याचा परिणाम असा झाला कि, मुलुंडमध्ये जास्तीत जास्त संघ शाखा आणि गणवेशातील स्वयंसेवक दिसू लागले. सुमारे 30 वर्षे गोवले गुरुजींनी मुलुंडमध्ये संघकार्यात स्वत:ला झोकून दिले. मुलुंड पश्चिमेला विजयनगर हा झोपडपट्टी विभाग आहे. या ठिकाणी वडारी आणि गवळी समाजाची वस्ती आहे. तेथे जाऊन तेथील मुलांसाठी मोफत अभ्यासिका चालवणे आणि त्यांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी ​यासाठी गुरुजींनी नेहमीच प्रयत्न केले. वक्तशीरपणा, सचोटी हे संघशाखेतील संस्कार त्यांनी नेहमीच आपल्यासोबत जपले.

​पहाटेपासूनच गोवले गुरुजींचा दिवस सुरू व्हायचा. समाजकार्य नसानसात असल्यामुळे रात्रंदिवस रा.स्व. संघ, मुलुंडचा घरेलू कामगार संघ आणि कुणबी समाज यांशिवाय त्यांना दुसरे काही सुचत नसे. त्यामुळे एकाचवेळी तीन जबाबदार्‍या गोवले गुरुजी पार पाडत. त्यामुळे मुलुंडमध्ये त्यांचा प्रचंड जनसंपर्क निर्माण झाला होता. येणार्‍या आणि भेटणार्‍या माणसाचे आदरातिथ्य हा त्यांचा विशेष गुण होता. मुलुंडच्या घरेलू कामगार संघाची स्थापना गोवले गुरुजींच्या घरातच झाली. घराघरात घरकाम करणार्‍या महिला आणि पुरुषांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी श्री. केसरकर, श्री. पारदळे आणि श्रीमती नलावडे आजी यांच्या सहकार्याने घरेलू कामगार संघ स्थापन केला. या कामगारांना एकाच छ्ताखाली त्यांनी एकत्र आणले आणि सुट्ट्या, वेतन यांचे महत्व सांगून जनजागृती केली. २५ सदस्य संख्येने घरेलू कामगार संघ सुरू झाला आणि ​पुढे ती संख्या हजारोंच्या घरात गेली.

​1992-93 साली अयोध्येच्या ​राममंदीर आंदोलनात गोवले गुरूजी अयोध्येत कारसेवक म्हणून गेले होते. त्या काळात संपूर्ण देशात दंगलीचे वातावरण होते. तरिही अन्य हजारो कारसेवकांबरोबर ​स्वत:चा जीव धोक्यात घालून ते अयोध्येत गेले होते आणि घरी सुखरुप परतलेही.

 

मुलुंडचा कुणबी समाज विकास संघाची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. शांताराम गोवले, उमेश पाटील, विनायक घाणेकर, श्री.निकम, श्री. जाधव हे डिसेंबर 1998 मध्ये गोवले गुरुजींना भेटले आणि मुलुंडमध्ये कुणबी समाजाची संस्था असावी आणि त्याद्वारे समाज ​ बांधवाचा विकास व्हावा याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मुलुंडमध्ये कुणबी समाज संघ आकाराला आला. कुणबी समाज ​विकास संघ मुलुंड चे ते संस्थापक अध्यक्ष होते. कुणबी संघाचे काम वाढविण्यासाठी घरोघरी जाऊन सदस्य संख्या वाढवण्यासाठी मोलाचा सहभाग नोंदवला . स्वत:च्या घरातच त्यांनी ​कुणबी संघाचे कार्यालय थाटले होते. घरातच सर्व साहित्य सामुग्री यांचा पसारा होता. पुढे पुढे कुणबी समाज संघाची आर्थिक उन्नती झाली आणि कार्यालयाचे स्थलांतर केशवपाडा येथे झाले. आज कुणबी समाज विकास संघ, मुलुंडचे काम अतिशय यशस्वीरित्या सुरू आहे. विकास संघातर्फे यशस्वी पतपेढी चालविली जात आहे. ​

आपल्या संपर्कात येणारा कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यासाठी त्यांनी शिक्षक मित्राच्या मुलाला, स्वत:च्या नातेवाईकांना स्वत:च्या घरी आणून शिकवले आणि त्यांचा उत्कर्ष साधला. शाळेमध्येदेखील त्यांच्याकडे शारीरिक शिक्षण हा विषय असला तरीही, गरीब वा अभ्यासत मागे असलेल्या मुलांसाठी अभ्यासवर्ग कामाच्याव्यतिरिक्त जादा वेळ देऊन ते चालवत आणि त्या मुलांच्या अभ्यासात त्यांनी लक्षणीय सुधारणा करून दाखविली होती.

गोवले गुरुंजीचा जनसंपर्क अफाट होता. त्यासाठीच एकदा त्यांना महापालिका निवडणूक तुम्ही लढा म्हणून काहीजणांकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु, रा.स्व. संघाच्या विचारसरणीमूळे त्यांनी समाजकार्याला वाहून घेतल्याने ते नेहमीच राजकारणापासून अलिप्त राहिले. त्यामुळे, त्यांनी निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिला.

आज गोवले गुरुजी हयात नाहीत. रा.स्व. संघाची शिस्त, शाखेत आणि बौध्दीक शिबिरात झालेले संस्कार यातून त्यांनी आयुष्यभर संघकार्य केले आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन इतरांच्या जीवनात आनंद निर्माण केला… त्यांच्या स्मृतीस प्रणाम..

Related posts

एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची कसरत

शिक्षणमंत्र्यांचा उरफाटा निर्णय; रात्र शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांवर केला अन्याय

एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?

Voice of Eastern

Leave a Comment