मुंबई :
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी अनेक पालकांना तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरता आले नाही. त्यामुळे २८ फेब्रुवारीला संपणारी प्रवेशाची मुदत १० मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०२२-२३ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येत आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना अर्ज भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातून १ लाख ७५ हजार ४८७ पालकांनी अर्ज केले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ३३ हजार २२८ इतके अर्ज आले आहेत. त्याखालोखाल नागपूरमधून २४ हजार २४९, ठाणे १६ हजार ७४५, औरंगाबाद ११ हजार ८०, मुंबई १० हजार ७३९, नाशिक १० हजार ६६१ इतके अर्ज आले आहेत. मात्र राज्यातील काही जिल्ह्यामंध्ये गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी विलंब झाला होता. त्यामुळे या जिल्ह्यातील पालकांना अर्ज भरता आले नाही. ही बाब लक्षात घेऊन आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना अर्ज भरण्यासाठी १० मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालनालयाचे संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी दिली आहे.
कमी प्रवेश अर्ज आलेले जिल्हे
- सिंधुदुर्ग – ११३
- नंदुरबार – ४२७
- गडचिरोली – ४९०
- रत्नागिरी – ५७५
- हिंगोली – ७१०
- उस्मानाबाद – ९८९