मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाला. त्यामुळे पुढील वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशाचे पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आरटीईची पहिली सोडत ८ आणि ९ मार्चदरम्यान होणार आहेत. तर या प्रवेशासाठी १ फेब्रुवारीपासून पालकांना अर्ज करता येणार आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकाराअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये समाजातील दुर्बल व वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता २५ टक्के जागा राखीव आहेत. राज्यातील शाळांमध्ये या जागांवर प्रवेश देण्यासाठी शिक्षण संचालनालयाच्या वतीने वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळांमधील उपलब्ध जागांसंदर्भातील नोंदणी २८ डिसेंबर ते १७ जानेवारीदरम्यान होणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा होत्या. या जागांसाठी राज्यातून २ लाख २२ हजार ५८४ बालकांचे अर्ज आले होते. यापैकी १ लाख ०२ हजार ९६९ बालकांनी प्रवेश निश्चित केला. त्यातील ७१ हजार ७१७ बालकांचे शाळांत प्रवेश घेतले तर २४ हजार ९६८ जागा रिक्त राहिल्या आहेत. जाहीर केलेल्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार संचालनालय स्तरावरुन बदल करण्यात येतील. यासाठी राज्यात एकदाच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहिर केली जाणार आहे.
संभाव्य वेळापत्रक
- शाळास्तरावर पुनर्तपासणी – २८ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२
- पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे – १ ते २८ फेब्रुवारी २०२२
- सोडत काढणे – ८ आणि ९ मार्च २०२२
- कागदपत्रांची पडताळणी, तात्पुरता प्रवेश – १० ते ३१ मार्च २०२२
- प्रतिक्षा यादी टप्पा १ : १ ते ७ एप्रिल २०२२
- प्रतिक्षा यादी टप्पा २ : ११ ते १९ एप्रिल २०२२
- प्रतिक्षा यादी टप्पा ३ : २५ ते २९ एप्रिल २०२२
- प्रतिक्षा यादी टप्पा ४ : २ ते ९ मे २०२२