मुंबई :
आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी राबविण्यात येणारी आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी १७ फेब्रुवारीपासून पालकांना अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया गोंदियामध्ये १६ फेब्रुवारीला सुरू झाल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये १७ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. शाळांची आरटीईच्या संकेतस्थळावर नोंदणी होण्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्याने १ फेब्रुवारीचा आरटीई प्रवेशाचा मुहूर्त चुकला होता.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. त्यानुसार २५ जानेवारीपासून शाळांच्या नोंदणीला सुरुवात झाली. याआधी १ फेब्रुवारीपासून पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करता आली नव्हती. त्याऐवजी आता १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरता येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी गोंदियामध्ये १६ फेब्रुवारीपासून दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये १७ तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
दोन वर्षांपासून आरटीई प्रवेशप्रक्रिया संपण्यास जानेवारी उजाडतो. त्यामुळे अर्ध्याहून अधिक अभ्यासक्रम शिकवून झाल्यामुळे उशिरा प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले. हे नुकसान टाळण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षांपासून आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशप्रक्रिया ३० सप्टेंबरपूर्वी राबवण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिल्या होत्या. मात्र आरटीई अर्ज नोंदणीलाच उशीर झाल्यानंतर इतर प्रक्रिया वेळेत कशी पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.