सेंत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ हे गेल्या ९८ वर्षांपासून कार्यरत असलेले मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्वात जुने वाङ्मय मंडळ आहे. मराठी संस्कृतीशी असलेली नाळ जोडून राहण्यासाठी आणि आजतागायत चालत आलेला मराठी संस्कृतीचा वारसा असाच पुढे चालू राहण्यासाठी म.वा.म. नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आले आहे. यावेळेस देखील अशाच एका उपक्रमामुळे म.वा.म. चर्चेत आले आहे. म. वा. मं. हे दर वर्षी एक दिवाळी अंक (तेजोमय) प्रकाशित करत आणि प्रत्येक तेजोमय वेगळा आणि जरा हटके झाला पाहिजे यासाठी मंडळाचे सर्वच सभासद नेहमीच प्रयत्नशील असतात. सुरवातीला तेजोमय हा एक वार्षिक दिवाळी अंक होता. त्यानंतर त्याचे रूपांतर ब्लॉगमध्ये झाले, तर ह्या वर्षी तेजोमय विविध कार्यक्रमांच्या स्वरूपात प्रस्तुत झाला.
८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान “तेजोमय-२०२१” रंगला होता. आनंद हा शब्द अनेक वेळा गृहीत धरला जातो. महामारी नंतर तर अनेक शब्दांची व्याख्या बदलली आहे, आनंद हा त्यापैकीच एक. जग अनलॉक होत आहे आणि न्यू नॉर्मलशी आपण जुळवून घेत आहोत, तर आनंदाची चर्चा नक्कीच फलदायी ठरू शकते. यामुळे “निखळ आनंद” हि संकल्पना (थीम) निवडली गेली होती.
तेजोमय २०२१ ची संकल्पना निखळ आनंद असल्यामुळे हास्य आणि विनोद हे तर येणारच, आणि जिथे विनोद आला तिथे थोर साहित्यकार पु. ल. देशपांडे यांची आठवण आली नाही तर नवलच म्हणावे लागेल. म्हणूनच ८ नोव्हेंबर रोजी थोर साहित्यकार पु. ल. देशपांडे उर्फ भाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना म्हणून मंडळाने “भाईंचा कट्टा !” हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मंडळाच्या सभासदांनी विविध कला सादर करून जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचे मनोरंजन केले होते. स्टँड-अप कॉमेडी, एकपात्री अभिनय, अभिवाचन, पत्रवाचन, सुरेल गीत अश्या विविध सादरीकरणांमुळे ती संध्याकाळ अगदी पुलमय झाली होती. कार्यक्रमास सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री “सुप्रिया पाठारे” यांची प्रमुख उपस्थिती होती. अनन्या महाले आणि निया जैन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यानंतर दुसऱ्या दिवशी “तेजांकित- वारसा आनंदाचा” हा कार्यक्रम रंगला होता. मंडळाच्या गेल्या ९ वर्षांच्या “मुख्य सचिव” यांना आमंत्रित केले होते. आजच्या ९८ वर्षांपर्यंतचा मंडळाचा प्रवास आणि त्यातील गोड व हळव्या अश्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या. विविध देशांतून मंडळाच्या माजी सभासदांनी उपस्थिती दर्शवली होती.
विद्यार्थ्यांसाठी “कलावली – रांगोळी मनोरंजनाची” या कार्यक्रमाच्या अंतर्गत “नृत्याभिनय” आणि “चित्रकथी परंपरा” या २ कार्यशाळांचे आयोजन केले होते. मराठी अभिनेत्री अपूर्वा परांजपे आणि कलाकार मेधा देशपांडे यांनी अनुक्रमे सदर कर्यशाळांद्वारे विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. सदर कार्यक्रमाचे जेरील बिनोज, अर्णव जोशी आणि शिवानी जोशी यांनी सूत्रसंचालन केले होते.
‘तेजोमय २१ -निखळ आनंद ‘ च्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी “निखळ आनंद-एक परिसंवाद” हा कार्यक्रम अतिशय उत्तमपणे पार पडला. ह्या परिसंवादात निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती .
या मान्यवरांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री, भारतातल्या पहिल्या दृष्टिहीन महिला सनदी अधिकारी IAS प्रांजल पाटील आणि समाजसेवक -Philanthropist डॉ. चिनू क्वात्रा यांचा समावेश होता. आनंद म्हणजे नक्की काय?त्याची प्रत्येका साठीची व्याख्या कशी बदलते आणि तो मिळवण्याची पद्धत देखील सगळ्यांसाठी कशी वेगवेगळी असते ह्या विषयी गप्पा रंगल्या. मान्यवरांनी अतिशय मनमोकळ्या पद्धतीने त्यांची मतं व्यक्त केली. ह्याच बरोबर निखळ आनंद हे उपस्थित वक्ते आपापल्या विविध क्षेत्रांच्या द्वारे लोकांपर्यंत कसे पोहचवतात ह्या बद्दल देखील चर्चा झाली. त्याचबरोबर आनंदाच्या एखाद्या क्षणाविषयी बोलायल्या सांगितल्यावर खूप गंमतीशीर आणि रोमांचक किस्से सर्वच मान्यवरांकडून ऐकायला मिळाले. गप्पा गोष्टींमधे वेळ कसा गेला हे कळलेच नाही आणि कार्यक्रमाचं सार म्हणजे ‘आनंद हा इतरांमधे वाटल्यावर द्विगुणित होतो’ या उत्तम विचारावर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी “शब्दांची गोळाबेरीज” या पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडला. तसेच तेजोमय ॲानलाईन अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.