मुंबई :
घर, शाळा आणि समाजात मुला-मुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी शाळा, केंद्र आणि तालुका अशा विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठीत करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व संतुलित वातावरण मिळावे यासाठी या समित्या कार्यरत राहणार असून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणने या समितीचे मुख्य काम असणार आहे.
शाळा व त्या शाळेच्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के मुला-मुलींची उपस्थिती राहावी. दिव्यांग विद्यार्थ्यांची पटनोंदणी १०० टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी नांवनोंदणी करणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, विद्यार्थ्याच्या भावनिक, शारीरिक व बौध्दिक विकासासाठी समुपदेशन करणे अशी कार्य या समित्यांमार्फत करण्यात येणार आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या समित्या स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. शाळा स्तरावर असलेल्या समितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेच समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याच बरोबर सदस्य म्हणून शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी, महिला पालक, शाळेतील चार विद्यार्थी प्रतिनिधी यामध्ये दोन मुले आणि दोन मुली, तर शाळेचे मुख्याध्यापक हे समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
समितीचे काम काय
शासकीय योजनांची माहिती देणे, मुला-गुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे, बालविवाह रोखून जनजागृती घडविणे, सीएसआरच्या माध्यमातून माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे ही उद्दिदिष्ट्ये साध्य करण्याची जबाबदारी आहे. तसेच मुलींच्या शिक्षणाबाबत ज्या अडचणी किंवा समस्या आहेत त्याची माहिती देणे व समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करावयाच्या आहेत.