मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा २०१९ चा अंतिम सुधारित निकाल मंगळवारी जाहीर झाला. साताऱ्याचा प्रसाद चौगुले हा सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम आला. रोहन कुवर हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे. २०१९ राज्यसेवा परीक्षेतील ४२० पदांचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य सेवा आयोगाने ४२० जागांसाठी ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या माध्यमातून उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधिक्षक अशी वेगवेगळी २६ प्रकारची पदे भरली जाणार आहेत. एमपीएससी ४२० पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
१० सप्टेंबरपूर्वी नियुक्त्या द्या, अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा विद्यार्थ्यांच्यावतीने देण्यात आल्यानंतर आयोगाने निकालाविषयी भूमिका जाहीर केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात यासाठी पत्र दिले होते.