मुंबई :
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तब्बल ७२ तासाचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेने आज यासंदर्भात घोषणा केली. शनिवारी मध्य रात्री १२ वाजल्यापासून सोमवारी मध्य रात्री १२ वाजेपर्यत मेगाब्लॉक असेल. या काळात १७५ पेक्षा अधिक लोकल ट्रेन, ४० पेक्षा अधिक मेल एक्स्प्रेसच्या गाड्या रद्द केल्या जातील. तर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे ठाणे आणि दिवा दरम्यान ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामांसाठी आणि दिवा येथे नवीन आरआरआय इमारत सुरू करण्यासाठी ७२ तासाचा विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा ब्लॉक शनिवार/रविवार मध्यरात्री १२ वाजता) ते सोमवार/मंगळवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत शुक्रवारी रात्री ११.१० ते पहाटे ४ वाजेपर्यत कल्याण येथून सुटणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस आणि अप जलद उपनगरीय गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्टेशनवर थांबणार नाहीत. रविवारपासून अप जलद गाड्या कळवा प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि नवीन बोगदा-१ मार्गे नव्याने तयार केलेल्या जलद मार्गावर चालविण्यात येतील.