आजच्या काळात सिंगल अल्बम्सचा बोलबाला आहे. नवनवीन सिंगल्स संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होत असून, याद्वारे नवनवीन कलाकार, गायक, संगीतकारांनाही आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळत आहे. बरीच वर्षे संगीतक्षेत्रात कार्य केल्यानंतर सिनेवितरणात महत्त्वाची कामगिरी बजावणारी पिकल एन्टरटेन्मेंट कंपनी मागील काही दिवसांपासून पिकल म्युझिकच्या माध्यमातून संगीतप्रेमींच्या सेवेत नवनवीन गाणी सादर करत आहे. पिकल म्युझिकनं बनवलेल्या सर्वच गाण्यांना रसिकांचा तूफानी प्रतिसाद लाभत आहे. संगीतप्रेमींकडून मिळत असलेल्या प्रेमाच्या बळावरच पिकल म्युझिकचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हि जोडी आणखी एक नवं कोरं गाणं घेऊन आली आहे.
‘सावरल्या वाटा…’ हे पिकलचं नवं गाणं संगीतप्रेमींचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. नुकतेच ‘सावरल्या वाटा…’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिच्या सुमधूर आवाजात हे गाणं रेकॅार्ड करण्यात आल्यानं ‘सावरल्या वाटा…’ला एक वेगळंच ग्लॅमर प्राप्त झालं आहे. या गाण्यातील शब्दांना सावनीनं आपल्या अनोख्या गायनशैलीच्या बळावर अचूक न्याय दिला आहे. गीतकार मंदार पारखी यांनी हे गाणं लिहिलं असून, संगीतबद्धही केलं आहे. कैलाश काशिनाथ पवार यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. यासोबतच कैलाश यांनीच या गाण्याची अप्रतिम संकलनही केलं आहे. नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी करण्याचं काम डिओपी सुनीत गुरव यांनी चोख बजावलं असून द्रोण व्यवस्था प्रीतम अंडागळे यांनी सांभाळली आहे. दीपिका विश्वास हा नवा चेहरा या गाण्याद्वारे मराठीत इंट्रोड्युस करण्यात आला आहे.
दीपिका बिश्वास ही सुरेख नृत्यांगना आहे. मूळची उत्तराखंडमधील असलेली दीपिका व्यवसायानं कॅनव्हास पेंटर असून, ऑइल, अकरिलीक आणि वॅाटर कलर्सच्या सहाय्यानं चित्रं रेखाटण्यात ती पटाईत आहे. भारतासोबतच विदेशातही दीपिकाच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. दीपिकाला चित्रकलेखेरीजही आपल्या अंगी असलेले इतर कलागुण जगासमोर आणण्याची इच्छा आहे. याच कारणामुळं तिनं अभिनयात पदार्पण केलं आहे. नृत्य आणि संगीताचंही तिला अंग आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या पिकल म्युझिकच्या ‘प्यार की राहों में…’ या म्युझिक हिंदी अल्बमद्वारे ती अभिनयाकडे वळली आहे. याबाबत दीपिका म्हणाली की, नृत्यासोबतच अभिनयही माझं पॅशन आहे. मी जर डान्समुळे श्वास घेऊ शकत असेन, तर अॅक्टिंगमुळं जगत आहे. भविष्यात मला चित्रपट, वेब सिरीज यांच्या जोडीला शॅार्ट फिल्म्स आणि म्युझिक अल्बम्समध्येही विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा आहे.