मुंबई :
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी साकीनाका येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून जोरदार मागणी केली. संचालक राजेश सुभेदार आणि मुख्याध्यापिका ज्योती सुभेदार यांच्या माध्यमातून ही भारतरत्न पुरस्कराची मागणी करण्यात आली.
गेली अनेक वर्षे सामाजिक संस्था, संघटना व महिलांकडून सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी मागणी सुरू आहे. चूल आणि मुलं मर्यादित असलेल्या मुलींना व महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी खूप हाल सोसले. सावित्रीबाईमुळेच आज मुली उच्च शिक्षण घेत आहेत. मुलींना शिक्षणाच स्वातंत्र्य देणाऱ्या सावित्रीबाईना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शाळेतील इयत्ता ४ ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थीनीनी कपाळाला आडवी चिरी लावून सावित्रीबाई फुलेची वेशभूषा साकारली. २५० हुन अधिक मुलींनी स्वाक्षरी करून भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली. या स्वाक्षरी आम्ही पंतप्रधान व राष्ट्रपती कार्यालयाना पाठविणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सुभेदार यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थिनींनी कोव्हिडं नियमांचे पालन करत ही मागणी केली.