मुंबई :
मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबई, वसई-विरार भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. मात्र विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनमध्ये परवानगी नसल्याने त्यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची मागणी पालक, शिक्षक व शाळांकडून करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने १८ वर्षांखालील मुलांना लोकल ट्रेनचे तिकिट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार राज्यामध्ये शाळा टप्प्याटप्याने सुरू होत आहेत. शालेय शिक्षण विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू केले. मात्र विद्यार्थ्यांना लोकल ट्रेन प्रवास करण्याची मुभा नसल्याने त्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे अडचणीचे ठरत होते. विद्यार्थ्यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालय गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. काही पालक त्यांच्या पाल्यांना दुचारी किंवा गाडीतून शाळेत सोडत आहेत. त्यामुळे पालकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांना रेल्वे तिकिट द्यावी, अशी मागणी पालक, शिक्षकांकडून करण्यात येत होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनंतर दोन लस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेन प्रवासाची परवानगी दिली होती. आता मध्य व पश्चिम रेल्वेने १८ वर्षाखालील मुलांना लस देण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भातील परिपत्रक मध्य व पश्चिम रेल्वेने काढले आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
वैद्यकीय आवश्यकता असलेल्यांनाही परवानगी
प्रवासावेळी १८ वर्षाखालील मुलांनासोबत ओळखपत्र बाळगावे लागेल. यासंदर्भात राज्य सरकारच्या सूचनेनंतर रेल्वेने मुलांना लोकल ट्रेन प्रवासाची परवानगी दिली. वैद्यकीय कारणास्तव ज्या व्यक्तींना लस घेऊ नये असा डॉक्टरांनी सल्ला दिला असेल, त्यांनी प्रवासादरम्यान डॉक्टरांचे योग्य प्रमाणपत्र ठेवावे. डॉक्टरांचे प्रमाणपत्राशिवाय रेल्वेचे तिकिट मिळणार नाही.