Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

शाळांना दिवाळीची सुट्टी परत मिळणार; शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळीची खास भेट

banner

मुंबई : 

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने दिवाळीची सुट्टी १ ते २० नोव्हेंबरऐवजी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर अशी केली. मात्र यामुळे दिवाळीची सुट्टी सहा दिवसांने कमी झाली. यामुळे शिक्षक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने कमी करण्यात आलेली सुट्टी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा नाताळच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देेश शिक्षण उपसंचालकांसह शिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

letter

शैक्षणिक वर्षात विद्यार्थी व शिक्षकांना ७६ दिवसांची सुट्टी दिली जाते. त्यानुसार वर्षाच्या सुरुवातीला मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी निश्चित केली होती. ऑक्टोबरच्या अखेरीस शिक्षण निरीक्षक कार्यालयाने दिवाळीच्या सुट्टीबाबत परिपत्रक काढले होते. त्यामध्ये वेळापत्रकानुसार सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नवे परिपत्रक काढून दिवाळी सुट्टी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर अशी केली. सुट्टीचा कालावधी अचानक बदलल्याने त्याचा परीक्षेवर होणारा परिणाम, पुढील सत्राचे नियोजन आणि दिवाळी सुट्टीसंदर्भातील नियोजन बिघडणार असल्याने शिक्षक व पालकांकडून याला विरोध करण्यात आला. यासंदर्भात शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण विभागासह शिक्षणमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला. याची दखल घेत अखेर शिक्षण विभागाने दिवाळीची कमी झालेली सहा दिवसांची सुट्टी पुन्हा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार ११ व १२ नोव्हेंबरला असणारे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण झाल्यानंतर शाळा पुन्हा सुट्टी घेऊ शकतात किंवा नाताळ किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या सहा दिवसांच्या सुट्टीचा समावेश करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक स्तरावर घेण्याच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षक संघटनांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

Related posts

४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खोखो स्पर्धेत उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, सांगली बाद फेरीत

मेट्रो स्टेशनवर झळकणार १४ वर्षींय वेदांत शिंदेचे चित्र

शिवसेनेच्या यशवंत जाधव यांचा लोकसभेचा मार्ग सुकर

Leave a Comment