Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबई विद्यापीठाची सुरक्षा रामभरोसे; सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना धरले धारेवर

banner

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये नुकतेच बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत पाहणी केल्याने सत्य प्रकार उघडकीस आला. मात्र या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसची सुरक्षा रामभरोसे असल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी नुकत्याच झालेल्या अधिसभेत केला. मुंबई विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांची कमतरता आणि त्यांच्याकडे असलेल्या अपुर्‍या सोयीसुविधांवर यावेळी सिनेट सदस्यांकडून बोट ठेवण्यात आले. मात्र विद्यापीठाच्या सुरक्षेबाबत कुलगुरूंकडे कोणतेही उत्तर नव्हते.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसचा परिसर फार मोठा आहे. यामध्ये विद्यापीठाचे अनेक विभाग असून, काही विभाग हे मुख्य दरवाजापासून फार आतमध्ये आहेत. तसेच या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने येथे अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कलिना कॅम्पसमध्ये सुरक्षारक्षकांची संख्या फारच कमी असल्याचा मुद्दा सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे यांनी अधिसभेत उपस्थित केला. कलिना कॅम्पसच्या सुरक्षेसाठी अवघे २०० सुरक्षारक्षकच असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. यावर सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला. कलिना कॅम्पसमधील सुरक्षारक्षकांवर नियंत्रण ठेवणे, सुरक्षा रक्षकांच्या ड्युटी लावणे, कॅम्पसच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला पूर्णवेळ सुरक्षा अधिकारीच नसल्याचे थोरात यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे कलिना कॅम्पसचा आवाका मोठा असल्याने काही घटना घडल्यास एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सुरक्षारक्षकांना तातडीने जाण्यासाठी दुचाकी नाही, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे वॉकीटॉकी नाही. कॅम्पसमध्ये अपुरे सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यातील बहुतांश हे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे कॅम्पसमध्ये घडणारी अनुचित घटना रोखणे सुरक्षारक्षकांना शक्य नाही. कलिना कॅम्पसची सुरक्षारक्षक भिंतही अनेक ठिकाणी तुटलेली असल्याने तेथून बाहेरील गर्दुल्ले, मद्यपी कॅम्पसच्या परिसरात येत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला. त्यामुळे कलिना कॅम्पसच्या सुरक्षेबाबत कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विद्यापीठाच्या सुरक्षेबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे स्पष्ट करताना थोरात यांनी काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी कॅम्पसमध्ये चौकी उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव विद्यापीठाला दिला होता. मात्र त्यासंदर्भातही विद्यापीठाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेले नाही. मुंबई पोलिसांची चौकी विद्यापीठात असती तर बराचसा सुरक्षेचा ताण सुरक्षारक्षकांवरील कमी झाला असता असे सांगताना नुकतेच कलिना कॅम्पसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. त्यापार्श्वभूमीवर कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवण्यात यावे, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी, सुरक्षारक्षकांना अद्ययावत सुरक्षा साधने पुरवण्यात यावेत, सुरक्षारक्षक भिंतीची डागडुजी करावी, अशी मागणीही सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात व डॉ. सुप्रिया करंडे यांनी केली. सिनेट सदस्यांकडून कुलगुरू व प्रशासनाचे वाभाडे काढले जात असताना कुलगुरू व प्रशासनाकडे कोणतेही उत्तर नव्हते.

Related posts

अकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात

Voice of Eastern

International Women Day : महिला आयोग कार्यपध्दतीची तोंडओळख

२५ पेक्षा अधिक कबुतरांच्या जीवावर बेतली संक्रांत

Voice of Eastern

Leave a Comment