विक्रोळी :
शारीरिक, घरगुती अत्याचार, विनयभंग यासारख्या समस्यांचा महिलांनी सक्षमपणे सामना करावा आणि स्व:संरक्षण करावे यासाठी यशोदीप फाउंडेशनतर्फे विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर येथील महिला व मुलींकरिता दोन दिवसीय स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महिला व मुलींनी स्वरक्षणाचे धडे गिरवले.
कार्यशाळेचे उद्घाटन माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत विक्रोळी पोलिस स्टेशन मधील निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तब्बसुम शादीवान व पोलीस उप निरीक्षक लक्ष्मी पवार यांनी उपस्थित महिला व मुलींना अत्याचारासंबंधित अस्तित्वात असलेल्या कायदेशीर बाबींची माहिती देऊन महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कशाप्रकारे लढले पाहिजे याची अनेक उदाहरणांसहित माहिती दिली. तसेच आणीबाणीच्या काळात महिलांच्या रक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शासनाच्या दूरध्वनी क्रमांकाची माहिती देऊन स्वतःचा मोबाईल नंबर देऊनही महिलांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. समाजसेविका राजोल संजय पाटील यांनी महिला व मुलींनी अत्याचार, फसवणूक व ब्लॅकमेलिंग निमुटपणे सहन न करता त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे न घाबरता तक्रार केली पाहिजे, अन्यथा याचे परिणाम पुढे गंभीर होतात. असे सांगून उपस्थित महिला व मुलींचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला.
कार्यशाळेत सेन्सेई सुरेंद्र सावर्डेकर यांनी दोन दिवस महिला व मुलींना स्वसंरक्षणाच्या अनेक युक्त्या प्रात्यक्षिकासह समजावुन त्याचा सराव करून घेतला. महिलांना स्वतः सोबत बाळगत असलेल्या दुपट्टा, की-चैन, फूटपट्टी व छत्री याचा वापर करून आपले संरक्षण कशा प्रकारे करता येईल याची प्रात्यक्षिके करून दाखवली.
कार्यशाळेत भाग घेतलेल्या सर्व महिला व मुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली. कार्यशाळेला महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल यशोदीप फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश सोनमळे यांनी त्यांचे आभार मानले व संस्थेचे सल्लागार दिलीप घाडीगावकर यांनी महिला व मुलींनी त्यांना शिकवण्यात आलेल्या स्वसंरक्षणाच्या सर्व युक्त्यांचा यापुढेही काही दिवस घरी सराव करण्याची गरज आहे. असे मत व्यक्त केले.