मुंबई –
पतीला भेटण्यासाठी घरी आलेल्या महिलेसोबत रेखा धोबी (२७) हिचा वाद झाला. या वादातून त्या महिलेने रेखाला लाटण्याने मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आपटले. यामध्ये रेखाचा मृत्यू झाल्याने त्या ५० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.
रेखा ही पती आशिष आणि दोन मुलासह घाटकोपरमधील रमाबाई कॉलनीमध्ये राहत होती. आशिष गवंडी काम करत असून, त्याने ४० हजार रुपये घेऊन ममता उके (५०) हिच्या एका घराचे काम केले होते. मात्र काम व्यवस्थित न झाल्यामुळे ममता उके हिने पैसे परत करण्यासाठी आशिषकडे तगादा लावला होता. गुरुवारी सकाळी ७ वाजता ममता उके ही आशिषला भेटण्यासाठी त्याच्या घरी आली. आशिष घरी नसल्याने तिने रेखासोबत वाद घालत तिला लाटण्याने मारहाण केली. तसेच तिचे डोके जमीनीवर आपटले. यामध्ये रेखा गंभीर जखमी झाली. पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रेखा हिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ममता उके हिला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.