मुंबई
शाळा सुरू करताना प्रत्येक शाळेमध्ये शिक्षणोत्सव साजरा करण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनौपचारिक स्वागत करत शाळा स्तरावर शैक्षणिक वातावरण निर्मितीचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काही शाळांनी रांगोळी काढली आहे याचबरोबर सॅनिटायझरपासून अन्य सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्यांच्या शाळा भेटीचे नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या असून, या भेटीचे छायाचित्र, व्हिडिओ फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्रामवर प्रसिद्ध करण्याच्या सूचना या अधिकार्यांना तसेच शाळा प्रशासनाला दिल्या आहेत.
शिक्षणोत्सव साजरा करताना विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केद्रप्रमुख, विषय सहाय्यक इत्यादींच्या भेटीचे नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिल्या आहेत. त्यानुसार या अधिकार्यांनी दिलेल्या शाळा भेटींचे फोटो, व्हिडिओ त्यांनी आपल्या किंवा सहकार्याच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यापैकी एका किंवा सर्व समाजमाध्यमावर पोस्ट करावेत. पोस्ट सोबत आपले नाव, पद, जिल्हा, तालुका, भेट दिलेल्या शाळेचे नाव, यु डायस क्रमांक, भेटीचा दिनांक व वेळ यांचा लिखित तपशीलही अपलोड करावा. तसेच ही पोस्ट समाजमाध्यमांवर पोस्ट करताना ती पब्लिक करण्यात यावी. फेसबुकवर स्टोरीमध्ये पोस्ट शेअर न करता वॉलवर शेअर करावी. भेटीच्या फोटोसोबत आपण आपल्या भेटीचा किंवा शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडिओ तयार करताना तो जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटांपर्यंतचा असावा तसेच फोटो व व्हिडिओ सुस्पष्ट असेल याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून क्षेत्रीय अधिकार्यांना दिल्या आहेत. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्याप्रमाणे शाळा प्रशासन, शिक्षक व मुख्याध्यापकांनीही या शिक्षणोत्सवाचे फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट करायचे आहेत. त्यामुळे सोमवारी शाळांमध्ये रंगणारा शिक्षणोत्सव हा त्याचवेळी समाजमाध्यमांवरही झळकणार आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे व त्याचे देखील फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात यावेत. पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/mvmj या प्रणालीवर सबमिट करावी.
पोस्ट, व्हिडिओ कशी पोस्ट कराल
समाजमाध्यमावर पोस्ट करत असताना दिलेल्या ‘#MVMJ2021’, ‘#शिक्षणोत्सव’ या टॅगचा वापर करून अपलोड कराव्यात. फेसबुकवर @SCERT,Maharashtra,@thxteacher या टॅगचा, ट्विटरवर @scertmaha, @thxteacher आणि इंस्टाग्रामवर @scertmaha, @thankuteacher या टॅगचा वापर करावा.