डोंबिवली :
डोंबिवलीतील मध्यवर्ती शिवसेना शाखेचा वाद शमला असल्याचे चित्र दिसत असले तरी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आजही धुमसत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याची तक्रार शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने डोंबिवलीच्या विष्णू नगर पोलिस ठाण्यात केली. त्या तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी शशांक रवींद्र माणगावकर याला अटक केली आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शशांक याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले होते. शिवसैनिकांच्या भावना दुखावून दोन गटात राजकीय तेढ निर्माण होऊन त्यापासून दंगा भडकविण्याची व गंभीर स्वरूपाचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच दोन गटाच्या सदस्यामध्ये द्वेषभावना निर्माण होण्याची शक्यता आहे, हे माहित असतानाही शशांकने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट केली. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची बदनामी करण्यास कारणीभूत असल्याची तक्रार शिंदे गटाचे उपशहरप्रमुख संतोष चव्हाण यांनी पोलिसात केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शशांकच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.