पिंपरी :
आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. आपल्याला एकट्यानं लढण्याची सवय आहे. शिवसैनिकांनी आघाडी होण्याची वाट न बघता जोमाने तयारीला लागावे. पक्षाला जास्तीत जास्त जागा निवडून आणावयाच्या आहेत. त्यासाठी प्रत्येकाने मनापासून काम करावे, असे आवाहन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
चिंचवड विधानसभेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. २८) रोजी चिंचवड येथील आनंदीबाई डोके सभागृहात नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी खा. बारणे बोलत होते. याप्रसंगी खा. श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख तथा सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात, शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, नगरसेवक राहुल कलाटे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, पिंपरी विधानसभेचे राजेश वाबळे, चिंचवड विधानसभेच्या अनिता तूतारे, शहर संघटक संतोष सौंदणकर, माऊली जगताप, हरीश नखाते, नवनाथ तरस, विजय साने, नाना सोनार तसेच मतदार संघातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. नागरिक सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला वैतागले आहेत. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनो सज्ज व्हा. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. सर्वांना बळ दिले जात आहे. भविष्यकाळ शिवसेनेचा आहे.
संपर्कप्रमुख तथा सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात म्हणाले, आपणा सर्वाना हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे. मागील पाच वर्षापुर्वी सत्ताधाऱ्यांनी ‘भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त पिंपरी चिंचवड’ अशा घोषणा दिल्या होत्या. पण या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा अंत झालाच नाही, उलट हा राक्षस जास्त वाढताना दिसत आहे. दररोज जनतेच्या पैशांची लुट केली जात आहे. पारदर्शी कारभारचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या या भाजपचा खरा चेहरा उघड करायचा आहे, त्यासाठी सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र या, सज्ज व्हा.
शिवसेनेचे विचार, ध्येय-धोरणे शहरातील प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचविण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी राबविलेल्या योजना जनतेपर्यत पोचविण्याचे काम शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून करत आहोत. प्रभागातील बूथ बांधणी मजबूत करण्यासाठी प्रत्येक बुथवर १० शिवसैनिकांची टीम तयार केली असून, पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा मास्टर प्लॅन तयार असल्याचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी सांगितले