मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांच्या लढाया, त्यांची कीर्ती, महती… ऑस्ट्रेलियामध्ये सुमधुर नवगीतांच्या माध्यमातून दुमदुमणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘सईशा फाऊंडेशन मुंबई’ निर्मित व प्रस्तुत ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २० फेब्रुवारीला हा कार्यक्रम ‘सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया’च्या सभासदांसाठी तसेच पर्थ, मेलबर्न, ब्रिस्बेन, सिडनी, अॅडलेड, कॅनबेरा व ऑस्ट्रेलिया टाईमझोनशी जवळपास असणार्या देशांमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. तसेच युके, यूएसए, कॅनडा, न्यूझीलँड, सिंगापूर, मलेशिया, दुबई, अबूधाबी, नेदरलँड, जर्मनी आणि मॉरिशस येथील मराठी बांधवांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.
शिवजन्म, स्वराज्याचे तोरण, वीर बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगड युद्ध, महाराजांची आग्रा भेट, स्वराज्याचे आरमार, शिवराज्याभिषेक आणि अशी अनेक स्फूर्तिदायी गीते सादर होणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीनिमित्त स्थित आपल्या देशातील मराठी जनांनी एकत्र येऊन ‘सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया’ संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून मराठमोळी संस्कृती जपावी आणि वारसा पुढील पिढीला मिळावा हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ‘कोरोनामुळे दोन वर्ष शिवजयंती मोठ्या स्वरुपात साजरा करू शकलो नाही, पण म्हणून उत्साह कमी झालेला नाही. पार्कमध्ये आम्ही महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करतो. यंदा सादर होणारा संगीत शिवस्वराज्यगाथा कार्यक्रम प्रत्येकासाठी पर्वणीच ठरेल, असे ‘सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया’चे अध्यक्ष संतोष काशीद म्हणाले.
‘शिवचरित्रातून राष्ट्रनिर्मिती हा या ऐतिहासिक संगीतमय कार्यक्रमाचा ध्यास आहे. आम्हाला आनंद आहे की ४२ नवगीतांमधून साकारलेले धगधगते शिवचरित्र ऑस्ट्रेलिया येथे पहिल्यादांच होत आहे.’ असे कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका, निवेदिका पद्मश्री राव म्हणाल्या.