मुंबई
लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले दिसून आले. मुंबईमध्ये विविध ठिकाणी शिवसैनिकांकडून रास्तारोको करण्यात आला. पूर्व उपनगरात भांडुप, घाटकोपर, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द या ठिकाणी केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आले तर विक्रोळीतील पूर्वद्रुतगती महामार्गावर शिवसेनेकडून सकाळी १० वाजताच्या सुमारास नारळाच्या झावळ्या व टायर टाकून पेटवून दिले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.
महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईतून दुकानदार व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईतील सर्वच बाजारपेठा पूर्णत: बंद होत्या. बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्व उपनगरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. यामध्ये घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लखीमपूर खेरी घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्याचप्रमाणे शिवसेना आमदार सुनील राऊत, विक्रोळीचे नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी सकाळी १० च्या सुमारास विक्रोळी येथे पूर्वद्रूतगती मार्गावर केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर टायर जाळण्याबरोबरच नारळाच्या झावळ्या आडव्या टाकून त्या पेटवून दिल्या. पोलिसांनी येऊन टायर व झावळ्यांना लावलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. तब्बल २० मिनिटे शिवसैनिकांनी महामार्गावर आंदोलन केल्याने पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. परिणामी ठाणे व मुंबईच्या दिशेने जाणार्या दोन्ही मार्गिकांवर गाड्यांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी शिवसेने नेते व कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना दूर केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पून्हा सुरू झाली. मात्र त्याच सुमारास कांजुरमार्गमधील शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे यांनीही कांजूरमार्ग येथे पूर्वदू्रतगती मार्गावर ठिय्या मांडत निदर्शने केल्याने पुन्हा वाहतूक ठप्प झाले. त्याचप्रमाणे भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर यांनीही शिवसैनिकांसह रस्त्यावर उतरून दुकाने बंद केली. तसेच असल्फा येते आमदार दिलीप लांडे आणि चेंबूर येथे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांनी जोरदार निदर्शने केली. हंडोरे यांनी अमरमहल येथे पूर्वद्रूतगती महामार्गावरच निदर्शने केली. त्यामुळे सोमवारच्या बंदचा सर्वाधिक फटका हा पूर्वद्रुतगती महामार्गाला बसल्याचे दिसून आले.