मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या वतीने २०१२ मध्ये सुरु झालेला माय मराठी प्रकल्प हा अत्यंत अभिनंदनीय आणि स्तूत्य उपक्रम असून शासकीय धोरण राबविण्यासाठी व अंमलात आणण्यासाठी भरीव कामगीरी या प्रकल्पाने केली असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे माननीय मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई यांनी केले. अन्यभाषकांना भाषिक प्रावीण्य पातळीनुसार आधुनिक आणि प्रमाणित अशा सर्वसमावेशक अभ्यासक्रमाद्वारे मराठी शिकण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मोठे योगदान दिले असून शासनाच्या प्रस्तावित असलेल्या मराठी भाषा भवन अंतर्गत स्थापन होणाऱ्या आभासी वर्गखोलीच्या माध्यमातून जगभरातील मराठी भाषकांपर्यंत पोहचण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा फायदा होऊ शकेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माय मराठी प्रकल्पाअंतर्गत अन्यभाषकांसाठी मराठीच्या प्रावीण्य पातळ्या २, ३, ४, ५,६ आणि विशिष्ट लक्ष्यगटांसाठी ४ लघु- अभ्यासक्रम आणि एपच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. विभा सुराणा, प्रा. मेहेर भूत यांच्यासह या प्रकल्पासाठी योगदान देणारे माधुरी पुरंदरे, सोनाली गुजर, प्र. न. परांजपे आणि गिरीषा टिळक यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, अमराठी भाषिकांना मराठी शिकता यावे यासाठी मराठी भाषेचे दरवाजे खुले करण्यासाठी हा अत्यंत स्तूत्य उपक्रम विद्यापीठामार्फत राबविण्यात आला. यामुळे मराठी बोलणाऱ्यांची, व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढेल, यासाठी सहा पातळींवर अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्यांने याची पातळी वाढविण्यावर भर देण्यात येणार असून जर्मन विभागाने यासाठी महत्वाची भूमिका बजावली असून ते अभिनंदनास पात्र ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाअंतर्गत परिचारिकांसाठी, रिक्षा, बँक कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पुस्तके तयार करून मोठा उपक्रम विभागाने राबविला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की, शासनामार्फत चर्नी रोड येथे मराठी भाषा भवन उभारले जात आहे. सर्वांना अभिमान वाटेल असे डौलदार असे भाषा भवन उभारले जाणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांना मराठी भाषेच्या ऐश्वर्याचे आणि सामर्थ्याचे दर्शन होईल. या भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे योगदान, इतिहास आणि समृद्ध परंपरा आदींची माहिती त्यात उपलब्ध होणार आहे. या भवनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील. ज्यामध्ये चर्चासत्रे, संवाद, विचारांची देवाण -घेवाण होत राहील. मराठी भाषेचे घडामोडींचे केंद्र म्हणूनही या भवनाची भूमिका अधोरेखित होणार आहे. मुंबई विद्यापीठाने माय मराठी प्रकल्पाअंतर्गत सुरू केलेले अभ्यासक्रम दीडशे देशांपर्यंत पोहचतील असा विश्वास वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माय मराठी प्रकल्पामध्ये शिखर संस्था असावी ते काम पूर्ण केले जाणार असून या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या वतीने सुरु केलेल्या माय मराठी प्रकल्पाअंतर्गत अन्यभाषकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आणि अध्ययन साहित्य हे मौल्यवान असून विद्यापीठामार्फत असे अनेक प्रकल्प भविष्यातही राबविले जाणार असून, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनूसरून अनेक महत्वपूर्ण प्रकल्प राबविले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी माय मराठी प्रकल्प हा अत्यंत वेगळा प्रयोग असून या प्रकल्पाची विद्यापीठाच्या सल्लागार समिती आणि नॅकमध्ये दखल घेतली गेली असल्याचे सांगितले. यावेळी राज्य विकास मराठी संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील आणि मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
माय मराठी प्रकल्प हा एक नाविण्यपूर्ण आणि आंतरविद्याशाखीय प्रकल्प असून पायाभूत व एकमेवाद्वितीय अशा या प्रकल्पाअंतर्गत भाषा शिक्षणासाठी प्रमाणित युरोपिय चौकटी नुसार अन्य भाषकांसाठी प्राथमिक स्तरापासून ते प्रगत स्तरापर्यंत पद्धतशीर आणि संरचित सामग्रीच्या ६ पातळ्या तयार केल्या गेल्या असल्याचे प्रा. विभा सुराणा यांनी सांगितले. टाळेबंदीच्या काळातही आभासी माध्यमातून या अभ्यासक्रमाचे अध्यापन सुरु ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.