Voice of Eastern

मुंबई : 

मुंबईसह राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सर्व रुग्णालयांना पुरेसा औषध साठा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्यातील महत्त्वाचे रुग्णालय असलेले मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा असल्याचे उघडकीस आले आहे. ब्लड प्रेशर, डायबिटीस, ताप, गर्भवती रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे रुग्णांना मेडिलक स्टोअरमधून विकत घ्यावी लागत आहेत. इतकेच नव्हे तर शस्त्रक्रियेसाठी लागणारे ब्लेड, युरिन बॅग, सिरींज यासारखी वैद्यकीय साधनेही रुग्णांना विकत आणण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत असून, त्याविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील महत्त्वाचे रुग्णालय असलेल्या जे.जे. रुग्णालयामध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ताप, सर्दी यासारख्या सामान्य आजारांपासून मधुमेह, रक्तदाब यासारख्या सर्वच आजारांवरील औषधे रुग्णालयात उपलब्ध नाहीत. ताप आलेल्या रुग्णांना देण्यात येणारी पॅरासिटेमॉल हे साधे औषध रुग्णालयात उपलब्ध नाही. मधुमेह, रक्तदाबाचे महिन्याची औषधे नेण्यासाठी येणार्‍या रुग्णांना एकही औषध रुग्णालयातून मिळत नाही. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची असलेली अ‍ॅट्रोवेस्टा, अ‍ॅसिटीसायलिक अ‍ॅसिड, फॉलिक अ‍ॅसिड ही औषधेही रुग्णांना विकत घेण्यास सांगण्यात येते. रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार्‍या रुग्णांना फक्त खाटेची सुविधाच वगळली तर सर्व औषधे विकत आणण्यास सांगण्यात येते. शस्त्रक्रिया असणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांना युरिन बॅग, हॅण्डग्लोव्हज, सिरिंज, पॅरासिटामोल इंजेक्शन, बेशुद्ध करण्यासाठी लागणारे फेनटानायल सायट्रेट, त्याचप्रमाणे अ‍ॅमोक्सिसायलीन, मेरोपेनेम, पिपेरासिलिन, टॅझोबॅक्टम यासारखे अँटिबायोटिक इंजेक्शनही रुग्णांच्या नातेवाईकांना विकत आणण्यास सांगितले जाते. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना देण्यात येणारे अझिथ्रोमायसिन आणि हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड ही औषधेही उपलब्ध नाहीत. मलमपट्टी तसेच अन्य इंजेक्शनसाठी वापरण्यात येणारे स्टेराईल वॉटर, आणि आयव्ही यासुद्धा रुग्णांना विकत आणण्यास सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हेपेटायटीस बीचे इंजेक्शन, सर्पदंशावरील इंजेक्शनही रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

जे.जे. रुग्णालयामध्ये असलेल्या औषधांच्या तुटवड्यामुळे गोरगरिब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. रुग्णालयांमध्ये महत्त्वाच्या औषधांचा साठा नसणे हे सरकारचे तसेच रुग्णालयाला औषध पुरवणार्‍या हाफकिन बायो फार्मासिट्युकलचे अपयश आहे.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर असोसिएशन

Related posts

म्हाडा सरळसेवा भरती – उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी लवकरच बोलावणार

शाळा मान्यता आता ऑनलाईन होणार

Voice of Eastern

मानसिक आरोग्यसाठी केंद्र सरकारकडून ‘टेली-मानस’ उपक्रम

Leave a Comment