मुंबई :
वैद्यकीय शिक्षण घेताना मानसिक तणावाखाली येऊन डॉक्टरांनी आत्महत्या केल्याच्या घटना वारंवार घडत असतात. आत्महत्याच्या या घटना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. डॉक्टरांच्या अडचणी व समस्या समजून त्यांचे मानसिक समुपदेशन करत त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नायर रुग्णालयाने ‘श्रुती’ उपक्रम सुरू केला आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येत असतात. हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना साडेतीन वर्ष घरापासून दूर राहावे लागते. अशावेळी शैक्षणिक ताण, आसपासचे वातावरण, वसतिगृहातील स्थिती यामुळे डॉक्टरांच्या मनामध्ये भीती निर्माण होते तर काही वेळेस काय करावे काय करू नये असे मानसिक द्वंद सुरू होते. यामुळे ते मानसिक तणावाखाली वावरण्यास सुरुवात होते. घरापासून दूर असल्याने मनातील भावना व्यक्त कोणाकडे कराव्यात असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना अधिक प्रबळ होत जाते, याची परिणिती विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत होत असल्याचे अनेक प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. ही बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, मानसिक द्वंद दूर करण्यासाठी नायर रुग्णालयाने ‘श्रुती’ हा उपक्रम हाती घेतला आहे. जनऔषध वैद्यक शास्त्र, मानसोपचार विभाग आणि मार्ड यांनी एकत्रित हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरुकता करण्यात येत असून, याचा डॉक्टरांना चांगल्याप्रकारे फायदा होत आहे.
कशा प्रकारे होते मार्गदर्शन
मानसिक तणावामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या या डॉक्टरांसोबत मानसोपचार तज्ज योग्य संवाद साधतात. त्यांना त्यांचे मन मोकळे करता येईल, अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करतात. त्यांची समस्या लक्षात आल्यावर त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करत आहेत. आतापर्यंत रुग्णालयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या जवळपास २०० पेक्षा अधिक डॉक्टरांना ‘श्रुती’अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.