मुंबई:
सुमारे ४ एकर जागेवर झोपडपट्टी उभारल्याचा मुद्दा नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये गाजला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नॅनो टेक्नोलॉजी विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे नव्याने झोपड्या उभारण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. या झोपड्यांबाबत तक्रार करूनही त्यावर कारवाई करण्याकडे विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये संशोधन केंद्राबरोबरच झोपडपट्टी निर्माण केंद्र सुरू करण्याचाही ठराव मंजूर केला आहे का असा प्रश्न सिनेट सदस्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नॅनो टेक्नोलॉजी विभागाच्या इमारतीच्या मागे काही वर्षांपासून बेकायदा झोपड्या उभारल्या जात आहेत. यासंदर्भात युवासेना सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी २८ सप्टेंबर २०१८ रोजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुळकर्णी यांची भेट घेऊन त्यासंदर्भातील छायाचित्रे त्यांना दाखवत ही बाब निदर्शनास आणून दिली होती. यावेळी प्र-कुलगुरू यांनी या बेकायदा झोपड्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासनही थोरात यांना दिले. परंतु मात्र अडीच वर्षामध्ये या झोपड्यांवर एकदाही कारवाई करण्यात आली नाही. मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार व दुर्लक्षामुळे कलिना कॅम्पसमधील जवळपास ४ एकरवर झोपडीधारकांनी यापूर्वी अतिक्रमण करून गृहनिर्माण संस्था स्थापन केली आहे. या जागेवर आता खासगी विकासकामार्फत एसआरए योजना राबवण्यात येत असल्याचे सिनेटमध्ये सदस्यांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. तरीही कलिना कॅम्पसमध्ये अन्यत्र उभ्या राहत असलेल्या झोपड्यांकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी व त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मुंबईच्या मध्यभागी कुर्ला येथील कलिनामध्ये विद्यापीठाला भलीमोठी जागा दिली. मात्र विद्यापीठाकडून लाखमोलाच्या जागेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यावर ठिकठिकाणी झोपड्या उभारल्या जात आहेत. त्यामुळे विद्यापीठाला जागा देण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची टीका युवासेना सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये संशोधन केंद्राबरोबरच झोपडपट्टी निर्माण केंद्र सुरू करण्याबाबतही ठराव मंजूर करण्यात आला आहे का असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला.
मुंबई विद्यापीठामध्ये अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकामावरील मजूर हे त्याच ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाच्या झोपड्या बांधून राहतात. त्यामुळे नॅनो टेक्नोलॉजी विभागाच्या इमारतीमागे असलेल्या झोपड्या या बांधकाम मजुरांनी तात्पुरता निवारा म्हणून उभारलेल्या आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.