Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

…म्हणून सिनेट प्रत्यक्ष घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य झाले आक्रमक

banner

मुंबई : 

विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा तसेच विद्यापीठाचा आर्थिक लेखाजोखा मांडण्यासाठी होणारी सिनेट कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वी ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील शाळा, मंदिरे उघडण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची ७ ऑक्टोबरला होणारी सिनेट ऑनलाईनऐवजी ऑफलाईन घेण्यासाठी सिनेट सदस्य आक्रमक झाले आहेत.

मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सप्टेंबरमध्ये सदस्यांना सिनेटची कार्यक्रम पत्रिका पाठवण्यात आली होती. यामध्ये ७ ऑक्टोबरला होणार असलेली सिनेट प्रत्यक्ष दीक्षांत सभागृहात होणार की दूरदृष्टीप्रणालीद्वारे होणार हे परिस्थितीनुसार ठरवण्यात येणार असल्याचे कळवले होते. मात्र आता सिनेट अवघ्या काही दिवसांवर आली असली तरी त्याबात प्रशासनाकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून मागील सिनेटप्रमाणे ही सिनेटसुद्धा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती निवळली असून, ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू आहेत, तर ७ ऑक्टोबरपासून मंदिरे उघडण्यात येत आहेत. तसेच सरकारने सार्वजनिक कार्य कोरोनाचे नियम पाळून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबरला होणारी सिनेट कोरोनाचे नियम पाळून दीक्षांत सभागृहात प्रत्यक्ष घेण्यात यावी, यासाठी युवासेनेचे सिनेट सदस्य आक्रमक झाले आहेत. युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबकर, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचाडे व महादेव जगताप यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र लिहून सिनेट ऑफलाईन घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान या सिनेटमध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाचा राज्यपालांनी नाकारलेला प्रस्ताव, कुलगुरूंनी घेतलेली महागडी गाडी, येस बँकेतील ठेवी यासारखे विषय गाजण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन सिनेटमध्ये घटनेने दिलेले स्थगन, पॉईंट ऑफ ऑर्डर यासारख्या विविध आयुधांचा वापर करता येत नाही. एखादा सदस्य आक्रमकपणे मुद्दा मांडत असेल तर कुलगुरूंकडून त्याचा आवाज ‘म्युट’ केला जातो. त्यांच्या मर्जीतील सदस्यांना विषय मांडण्यास वेळ दिला जातो. परिणामी विद्यार्थ्यांच्या समस्यांना ऑनलाईन सिनेटमध्ये वाचा फोडणे शक्य नसते.
वैभव थोरात, युवासेना सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

Related posts

बांधकामातून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी महापालिका आणणार एसओपी

निलेश राणेविरोधात आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक

‘टाइम बेबी’साठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक

Leave a Comment