मुंबई :
रुपारेल कॉलेजमधील विज्ञान इमारत, उपहारगृह, वसतिगृह अशा अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. या सुविधा नवीन इमारतीमध्ये सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे, मात्र आता वर्ष झाले तरी ना नवीन इमारत उभी राहिली ना विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. याबाबत माजी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन व्यवस्थापनासोबत चर्चा करण्याची विनंती केली आहे.
माटुंगा येथील रुपारेल कॉलेजमध्ये गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांसाठी विज्ञान इमारत, उपहारगृह, वसतिगृह अशा अनेक सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कॉलेज सुरू होऊन अनेक महिने झाले तरी या सुविधा बंदच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याचबरोबर अनेक इमारतींना लिफ्ट आहे त्याचा वापर सुरू नसल्यानेही विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचीही गैरसोय होत आहे. यामुळे याबाबत योग्य तो विचार करावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मुंबई विद्यापीठातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी भेटून केली आहे. याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी विनंतीही त्यांनी केली आहे. यापूर्वी चार ते पाच वेळा याबाबत भेट मागून भेट होऊ शकली नाही याबाबत नाराजी व्यक्त करत हा पत्रप्रपंच केल्याचे तांबोळी यांनी सांगितले.